Thursday, October 27, 2016

शौर्य

   कोर्ट मार्शल म्हंटले कि मनात धडकी च भरते. आर्मी, नेव्ही,एअर फोर्स मधील शिस्तभंग करण्याऱ्या अधिकाऱ्यांना होणारी शिक्षा म्हणजे कोर्ट मार्शल एवढेच माहित होते. या सिनेमा ने एक माणूस दुसऱ्या माणसाकडे कसा पूर्वग्रहीत दृष्टीने बघू शकतो आणि त्याचा त्याच्या कामावर होणारा परिणाम फार सुंदर रित्या चित्रित केला आहे. सामान्य माणसाला आर्मी म्हणजे शिस्त आणि शौर्य एवढेच माहित असते. पण त्यात काम करणारी माणसे सुद्धा सर्वसामान्यांसारखी असू शकतात किंवा वागू शकतात हे दाखवण्याचा एक चांगला प्रयत्न आहे.
    या सिनेमाची सुरवात होते एका कोर्ट मार्शल ने ,ज्यात  एका अधिकाऱ्याने त्याच्या वरिष्ठांना गोळी घालून मारून टाकले म्हणून त्याच्यावर आरोप असतो. यात दोन मित्र एकमेकांच्या विरुद्ध केस लढवण्यासाठी उभे ठाकतात. आरोपी काहीच सांगायला तयार नसतो. आरोपीचा वकील काय करायचे याचा विचार करत असतो. तेवढ्यात त्याला एक महिला पत्रकार भेटते. आणि मग त्या वकिलाचा सत्य शोधण्याचा प्रवास सुरु होतो त्यात तो वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो. जसे कि आरोपीची आई, जो अधिकारी मारला गेला त्याची बायको, त्या अधिकाऱयांचे वरिष्ठ. तो सगळ्याप्रकारे प्रयत्न करतो कि त्याला सत्य समजेल. आणि शेवटी जेव्हा सत्य समजते तेव्हा त्याला धक्का बसतो. शौर्य म्हणजे फक्त युद्धावर लढाई लढणे नाही तर योग्य गोष्टीच्या बाजूने लढणे सुद्धा आहे हेच इथे अधोरेखित होते. जात ,धर्म  यापेक्षा योग्य अयोग्य  काय आहे ते नक्की पहा असे हा सिनेमा अधोरेखित करतो.            
   
          

दिवाळी अंक -डिजिटल -खास खाद्यसंस्कृती

Wednesday, October 19, 2016

स्पाय- महिला गुप्तहेर


गुप्तहेर म्हंटले कि डोळ्यासमोर उभा राहतो तो जेम्स बॉण्ड. देखणा, रुबाबदार, धडाडी असलेला, बायकांच्या अवतीभवती वावरणारा एक वेगळेच व्यक्तिमत्व असेलेला. पण महिला गुप्तहेर कशी असू शकेल याचा काही अंदाज च आपल्याला लावता येत नाही. स्पाय हा सिनेमा अश्याच एका महिला गुप्तहेराची कथा आहे. गुप्तहेर म्हणजे चपळ, प्रसंगावधानी असावा असा आपला समाज असतो. पण या सिनेमात हि महिला गुप्तहेर चपळ आहे प्रसंगावधानी आहे पण ती आहे एक गुबगुबीत दिसणारी प्रथमदर्शनी निरुपद्रवी वाटणारी महिला. जी कुठे तरी ऑफिस मध्ये काम करत असावी असे वाटते. आणि अचानक आपल्या समोर येते ती गोलमटोल पण चपळ, बावळट वाटणारी पण प्रत्येक्षात हुशार आणि प्रसंगावधानी, गुप्तहेर या शब्दामागचे सगळे पूर्वग्रह या नटी ने पुसून टाकले आहेत. तिच्या करामती बघून असे वाटते कि गुप्तहेर म्हणजे एक वेगळेच रसायन असावे.  

Monday, August 22, 2016

बिहाइंड द एनिमी लाईन्स 2001

        वैमानिक आणि दिशादर्शक(नेव्हिगेटर ) एका टेहळणी विमान घेऊन जातात. टेहळणी करताना त्यांना त्या भागात काही संशयास्पद हालचाली दिसतात. ते त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात शत्रू च्या विभागात पोचतात. शत्रू विमानावर मिसाईल चा मारा करून ते पडण्याचा प्रयत्न करतात. त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करताना ते २ मिसाईल चुकवू शकतात पण तिसरी मिसाईल अचूक  हल्ला करते त्यामुळे विमान पेट घेते. ते विमानातून पॅराशूट च्या  साहाय्याने बाहेर पडतात. पण ते शत्रूच्या प्रदेशात पडतात. त्यात वैमानिक  जबर जख्मी होतो. तेव्हा नेव्हीगेटर त्याच्या ऑफिसर ना कळवण्यासाठी डोंगरावर जात असतो. तेवढ्यात शत्रूचे सैनिक येतात आणि वैमानिकाला शूट करतात. हे पाहून तो नेव्हीगेटर घाबरून ओरडतो. हे ऐकून ते शत्रूचे सैनिक त्याच्या मागे लागतात. तो त्यांना चकवण्यात यशस्वी होतो आणि मग सुरु होतो एक जीवघेणा पाठलाग.
        शत्रूचे सैनिक आणि एकटा नेव्हिगेटर यांच्यात. तो आपल्या ऑफिसर ना कळवण्यात यशस्वी होतो. पण शांतता प्रक्रिये मुळे तो ज्या प्रदेशात आहे तिथे जाणे त्यांना शक्य नसते ते त्याला शत्रूच्या प्रदेशाबाहेर यायला सांगतात. या दरम्यान वॉर शिप चा ऍडमिरल त्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवायचे ठरवतो पण त्याला तसे न करण्याच्या ऑर्डर मिळतात. तो अगदी हतबल होतो पण तो त्या नेव्हिगेटर ला सतत प्रोत्साहन देत राहतो. त्याचा जुनिअर ऑफिसर त्याला विचारतो कि आपण काहीच करू शकणार नाही का. तेव्हा तो मीडिया ला हि बातमी देतो. आणि ऑर्डरच्या  विरोधात त्या नेव्हिगेटर ला वाचवायला हेलिकॉप्टर्स घेऊन रवाना होतो.शेवटी तो त्या नेव्हीगेटरला वाचवण्यात यशस्वी होतो.ऍडमिरल चे सर्व सहकारी त्याच्या नेव्हीगेटर ला वाचवण्याच्या निर्णयावर खुश असतात.  त्यांनी काढलेल्या फोटोमुळे गुन्हेगारांना शिक्षा होते. पण सैन्याच्या ऑर्डर न पाळल्यामुळे ऍडमिरल ची बदली ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये  केली जाते. ती स्वीकारण्या ऐवजी तो  राजीनामा देतो. 



कुंग फु शेफ

   स्वयंपाक करणे हि एक कला आहे आणि ज्याला ती आवडते तो त्यात खूप बहार आणू  शकतो. कुंग फु शेफ हि कहाणी आहे त्या २ भावांची जे उत्तम शेफ होण्यासाठी सतत नवीन शिकत आहेत. पण एका उत्तम दर्जाच्या ड्रॅगन ब्लेड वरून त्यांचे भांडण होते त्यात एका भावाला वाचवताना दुसरा भाऊ जखमी होतो आणि तो जखमी भाऊ तिथून निघून जातो. 
   त्यानंतर बऱ्याच वर्षांनी दुसऱ्या भावाचा मुलगा एक नवीन हॉटेल सुरु करतो तो आपल्या काकाचा द्वेष करत असतो कारण त्याला वाटत असते कि त्याच्या काकामुळे त्याचे वडील दूर निघून गेले.आणि  त्यातील एक भाऊ नवीन शेफ तयार करण्यासाठी खूप धडपड करत असतो. हि धडपड कामास येते. एक उत्तम दर्जाचा शेफ होण्यासाठी एक मुलगा त्याच्याकडे शिकायला येतो.  स्वयंपाकातील बारीक सारीक खुबी इतक्या छान दाखवल्या आहेत कि बघून डोळ्याचे पारणे फिटले.
   एका स्पर्धेच्या निमित्ताने उत्तम प्रकारच्या डिशेश बघायला मिळतात.





  

Thursday, August 18, 2016

किंग्समन द सिक्रेट सर्व्हिस

बॉण्डपटांशी मिळत जुळत वाटावा असाच एक छान सिनेमा. आपले प्रोफेशन मुलाने निवडावे असे वाटणारे वडील, आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड करणारा मुलगा यात बघायला मिळतो. किंग्समन हि  सीक्रेट सर्व्हिस  नवीन एजन्ट ना सिलेक्ट करणे आणि ट्रैनिंग देणे हे काम करत असते. यात सीक्रेट सर्विस चे ट्रैनिंग दाखवले आहे. एखादी परिस्थिती थंड पणे कशी हाताळावी, भावनांना कसे कंट्रोल करावे आणि परिस्थितीनुसार निर्णय कसे घ्यावे हे इथे शिकवले जाते.
     एक सिम कार्ड भविष्यात काय करू शकते याचा एक भयानक अनुभव इथे दिसून येतो. आणि टेकनॉलॉजि चा वापर भविष्यात अयोग्य हाती पडला तर कसा अनर्थ होऊ शकेल याचे परिणामकारक चित्रीकरण येथे केले आहे. सिनेमाचा नायक आणि   व्हिलन यांची मारामारी, एकमेकांवर कुरघोडी बघायला मिळते       

Thursday, August 11, 2016

कवितेचे स्टॅंडर्ड

           कविता ऐकणारे समजून घेणारे मिळणे हा अगदी दुर्मिळ योगायोग असतो. त्यात हि फार कमी मासिके कविता करणाऱ्यांना मान देतात,बऱ्याच वेळी त्यांना अपमान च सहन करायला लागतो. असाच एक कवीने सांगितलेला किस्सा आज सांगणार आहे मी तो हि त्यांच्या भाषेत.
         माझी पहिली कविता मासिकात छापून आली आणि मला अगदी आकाश ठेंगणे झाले  असे वाटले कि आपण आता सेलिब्रेटी झालो. लगेच या विचाराने हवेत तरंगू लागलो. माझ्या काही मित्रांना सुद्धा मी फोन करून सांगितले कि माझी कविता छापून आली नक्की वाचा. लगेच मला मी खूप मोठा झालो अशी स्वप्ने पडू लागली. मग असे वाटले माझी कविता छापणाऱ्या मासिकाचे काय स्टॅंडर्ड असतात कविता छापण्याचे ते तरी पाहूया म्हणून मी माझी नवीन कविता घेऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. तिथे गेल्यावर विचारले कि मला संपादकांना भेटायचे आहे. मग त्यांनी विचारले काय काम आहे? मी सांगितले कि कविता द्यायची आहे. मग त्यांनी सांगितले कि त्या समोरच्या खोक्यात टाका. पण तरीही मी म्हणलो कि मला त्यांना भेटायचे आहे. मग त्या माणसाने मला संपादकाचे केबिन दाखवले.
           मी दारावर टकटक केली.आत या असा आवाज आल्यावर मी आत गेलो. संपादकाने मान वर करून पहिले   आणि विचारले काय काम आहे? मी लगेच नाव सांगितले आणि कविता द्यायला आलो आहे असे सांगितले  . त्यांनी म्हंटले ठीक आहे तिथे ठेवून द्या. मी चकित मला ओळखलेच नाही. माझा थोडा हिरमोड झाला. मी तिथेच उभा आहे हे बघितल्यावर पुन्हा विचारले काय हवे आहे अजून? मी विचारले कि तुमचे कविता निवडीचे स्टॅंडर्ड काय आहेत? हा प्रश्न ऐकल्यावर त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्यांनी मला विचारले कि तुमची कविता किती ओळीची होती ७ ओळीची का? मी आठवून हो सांगितले. मग ते म्हणाले कि ती सात ओळीची होती म्हणून आम्ही छापली ती. डिझाईन च्या खाली जेवढी जागा आहे त्यात मावणारी कविता आम्ही छापतो. एरवी आम्ही फारश्या कविता छापत  नाही. हे ऐकल्यावर मला काय बोलावे तेच कळेना. मी हळूच दरवाजाबाहेर  पडलो. कविता फाडून टाकली आणि   तेव्हापासून मला कळले कि कवितेपेक्षा हि मासिके कथा कादंबऱ्यांना जास्त महत्व देतात.                       

        

Wednesday, August 10, 2016

पिंपळ पान

आज अचानक अडगळीत
सापडले एक पुस्तक छान
उघडून जेव्हा पहिले मी
त्यात निघाले पिंपळपान
आखीवरेखीव कोरलेले
जाळीदार नक्षीकाम
अलवार आपुल्या प्रीतीची
एक निरागस आठवण छान


------- अंजली गोखले 


Wednesday, August 3, 2016

यामिनी

तू गेलास
तुझ्यासोबत
सूर माझे घेऊन गेलास
माझ्या मस्त जगण्याचा
नूर हि हरवून गेला
एकटी राहिली
आता तुझी यामिनी
तुझा राग पाहते
मी उदास होऊनि






Monday, August 1, 2016

वासंती

वासंती तू फुलवंती
माझी प्रिया तू गुणवंती
गोरी गोरी पान तू
फुलासारखी छान तू
मज सखी तू प्रेरणा
मी अधुरा तुझ्याविना


गुरु पौर्णिमा

         गुरु पौर्णिमा गुरुदेवांच्या शिकवणुकीला वंदन करण्याचा एक चांगला दिवस. आमच्या शाळेत सध्या गुरुपौर्णिमा झाली. आमचा कोर्स २ वर्षाचा आहे. त्यामुळे दोन्ही वर्षाची मुले मुली आली होती. नेहमी सारखे आम्ही बॅक बेंचवर बसून मजा करत होतो नेहमीच्या शाळेत फ्रंट बेंच वर असणारी मी बॅक बेंचवर बसून मजा करत होती, चक्क कंमेंट करणे चालू होते. कार्यक्रम सुरु झाला आणि आमच्यातल्या भाषणासाठी निवडलेल्या पहिल्या वर्षाच्या मुले आणि मुलींनी त्यांचे नुकतेच शिकवलेले विषय मांडले आणि त्यांची उडणारी तारांबळ बघून वाटले बरे झाले आपण नाही उभे राहिलो. पण सगळ्यांनी त्यांना छान सांभाळून घेतले. मलाही वाटत होते बोलावे पण भीती सुद्धा वाटत होती. पण जी मुले कोर्स पूर्ण करून गेली होती त्यातील काही जणांनी इतके अप्रतिम विषयानुरूप  भाषण  केले कि असे वाटले कि विषय शिकवायला च उभे असावेत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमचे सर. दोन्ही शिस्तीचे पण प्रवृत्ती एक्दम वेगळ्या असलेले एक एकदम  कडक मास्टर  वेळ पाळायचे धडे देणारे आणि दुसरे हसत खेळत शिकवणारे, भाषणाला टाळ्या पाडाव्यात म्हणून चक्क स्नॅक्स ठेवले नंतर आता खूप टाळ्या वाजवा हा असे मिश्किल पणे म्हणणारे. 
     या गुरु पौर्णिमेच्या  वेळी जाणवलेली एक खास गोष्ट म्हणजे  आमचे शिक्षक जे खूप तळमळीने शिकवतात आणि आम्ही सुद्धा तीच तळमळ दाखवावी म्हणून धडपडतात.नवीन शिकायला येणारी मुले जी धडपड करतात त्यांना शिक्षकांची छान  शाबासकी सुद्धा आम्ही अनुभवली.     

३६ चेम्बर ऑफ शाओलीन


आज हा सिनेमा बघितला. वेगवेगळ्या फायटिंग  टेकनिक कश्या शिकाव्या, एकाग्रता कशी करावी याचे फार उत्तम शिक्षण यातून मिळते. बॅलन्स कसा साधावा, डोके कसे शांत ठेवावे, आणि वारंवार सोप्या वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी कठीण असतात त्या कश्या समजून घ्याव्या हे वेगवेगळ्या चेम्बर च्या प्रशिक्षणातून कळते.  कुठल्याही गोष्टीत मास्टर होण्यासाठी प्रचंड परिश्रमाची आणि शिकण्याची जिद्द असावी लागते. हेच परिश्रम पुढे आपल्याला मोठे होण्यासाठी कामी येतात. योग्य जागी आणि योग्य वेळी केलेले प्रयत्न यशाच्या शिखरावर जायला आपल्याला मदत करतात.       

Friday, July 29, 2016

गॉसिप

कलियुग असो कि कोणतेही युग असो गॉसिप म्हंटले कि बायका हे समीकरण कायम असते. एकाच्या गोष्टी ऐकून दुसऱ्याला सांगितल्याशिवाय या व्यक्तींना चैन पडत नाही असे म्हणतात. पण या सगळ्या गॉसिप वाल्या बायकांचे आद्य गुरु कोण तर चक्क एक पुरुष. काय म्हणता पटत नाही कमाल आहे, हा पुरुष म्हणजे नारद. सतत भ्रमण करणे आणि सगळीकडच्या बातम्या सांगणे याशिवाय त्या बातम्या ऐकून समोरची व्यक्ती कशी आश्चर्यचकित होई याचे जिवंत उदाहरण म्हणजे नारदमुनी. त्यांचे टोपण नाव सुद्धा होतेच कि कळलाव्या म्हणजेच भांडण लावून देणारे. पण कधीतरी त्यांच्यावर हि अशी वेळ येत असेल कि कुठून आपण या प्रसंगात पडलो.
गॉसिप करणाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावे हे एक बुमरँग सारखे शस्त्र आहे जे उलटले तर तुमच्या चांगल्या गोष्टींचा नाश करायला कारणीभूत ठरू शकते.       
     

Wednesday, July 27, 2016

मिसिंग

    काल दूरदर्शनवर हरवलेले लोकांचे फोटो दाखवत होते. ते बघता बघता एकदम मला एका जुन्या गोष्टीची आठवण झाली. अगदी काल घडली असावी अशी वाटत होती ती. बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला. ती गोष्ट म्हणजे आमच्या ओळखीच्या  मुलीची गोष्ट.
    ताई जाऊ नकोस ना ग क्लास ला. मनाली सुनीताताईला सांगत होती. अग असे कसे चालेल क्लास नाही बुडवू शकत ग,पण मी लवकर येते हा,तू खेळ तो पर्येंत आणि आजीला त्रास देऊ नको. मनाली एक्दम हिरमुसून गेली होती. ताई स्वतःचे आवरून क्लासला गेली. मनाली खेळत बसली होती. पण तिला हळू हळू कंटाळा यायला लागला.  आजी सुद्धा काम करून थकून गेली होती. तिला झोप कधी लागली कळलेच नाही. आजीचे घर तळ मजल्यावर होते. दरवाजा फक्त लोटला होता बंद करायचा  राहून गेला होता.मग काय मनाली सरळ दरवाजा बाहेर पडली. वय वर्ष दोन फार काही कळण्याचे हे वय सुद्धा नाही. ताई ला शोधायचे हेच फक्त मनात.पण ताई कुठे जाते क्लासला हे कुठे माहित होते मग रस्त्यावर येऊन शोधायला लागली. पण ताईचा क्लास खूप लांब होता मनालीला कसा सापडणार. ती आपली कावरी बावरी झाली. घरापासून खूप लांब आल्यामुळे आता परत कसे जायचे ते सुद्धा कळत नव्हते तिला. तेवढ्यात एका शाळेत जाणाऱ्या मुलीने तिला पहिले आणि विचारले काय ग काय करते आहेस इथे तुझे घर कुठे आहे तर मनालीला फार काही सांगता येईना. ती फक्त एवढेच म्हणली कि माझ्या घरी समोर समोर जिना आहे त्या मुलीने २-३ सोसायटी दाखवल्या पण मनाली म्हणाली हे तिचे घर नाही. मग त्या मुलीने  मनाली ला पोलीस स्टेशन मध्ये सोडले.
    इथे सुनीता ताई घरी आली आणि बघते तर काय मनाली घरी नाही. तिने आजीला उठवले आणि सांगितले तशी आजी एकदम  घाबरून गेली. काय करावे सुचेना. मग सुनीता ने आईला फोन केला. मग आजी आणि आई पोलीस स्टेशनला गेल्या. तिथे त्यांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. कुठला ड्रेस घातला होता, किती उंची,कशी हरवली काय झाले आणि मग त्यांनी आजूबाजूच्या पोलीस स्टेशन वर कळवले. एका पोलीस स्टेशन ने अश्या वर्णनाची मुलगी आहे आमच्याकडे हे सांगितल्यावर सगळे तिकडे गेले. आणि पहिले तर मनाली छान  बिस्कीट खात बसली होती. आई दिसल्यावर लगेच आई करून बिलगली मग त्यांनी सगळी चौकशी केली पोलिसांची खात्री पटल्यावर त्यांनी मनालीला तिच्या आई आणि आजी कडे सुपूर्त केले.


डायरी

आज जुनी डायरी हाती लागली आणि  जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिल्यांदा डायरी लिहायची म्हणजे काय करायचे असा प्रश्न पडला होता. मग त्यात इतक्या गोष्टी लिहिल्या गेल्या कि आता वाचताना अगदी धमाल वाटते आहे. आनंद दुःख कुरबुरी छोट्या छोट्या गोष्टी त्या वेळी लिहिल्या आहेत ज्या आज वाचल्या तर वाटते आपण लहान पणी किती बालिश होतो ना. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा किती महत्वाच्या वाटतात जसे कि नवीन ड्रेस, खेळणी, साजरे केलेले वाढदिवस सगळे एकदम डोळ्यापुढे उभे राहिले. माझ्या आवडी निवडी ज्या दर वर्षी बदलत जायच्या. आणि मग त्याच्या नुसार काय व्हायचे  भविष्यात ते सुद्धा बदलायचे.

   अभ्यास कसा करायचा, अक्षर कसे सुधारावे ,बुद्धिबळ छान  कसा खेळायचा, मेक अप कसा करावा, रेसिपी सुद्धा लिहून ठेवल्यात, अंकशास्त्र कसे वापरावे, त्याशिवाय माझ्या जुन्या कविता सुद्धा सापडल्या आणि वाटले कि खजिनाच सापडलाय.         

चारोळी

रुठिये न हमसे
बाते तो कीजिये
दिल बेचैन है मेरा
आपकी याद में

यादो का सफर
कितना है सुहाना
जिंदगी के हर पल का
एक छोटासा फ़साना

होतो पे मुस्कराहट
आँखों में ये नमी
कौन सी ये बात
जो आपके दिल मे  छुपी है

एक हसींन इत्तेफाक था
आपका चले आना
दुःखभरा एहसास था
आपका वो चले जाना

दिल खामोश है
कुछ भी नहीं कहता
तेरी यादो के सिवा
अब इसमे कुछ भी नहीं रहता


दिल देंगे क्या आप
है क्या शुअर
वरना हम ढूंढ लेंगे
दूसरा कोई घर


हाल पूछो जरा
इन जनाब का
दे चुके है दिल
वो अपनेआपका


दिल की बात आये होटो पर
ऐसी हमारी हिम्मत कहा
समझ जाये वो दिल की बात
ऐसी खुशनसीब किस्मत कहा

अंजली गोखले 

Friday, July 22, 2016

ज्योतिष

   कुठलाही विषय शिकायला सुरवात केली की कुणी त्याला मास्टर समजत नाही बर का? पण त्याला ही काही अपवाद असतातच, आणि मग जे शिकले त्याची प्रचिती समोरच्याला हवी असते.  मग शिकणाऱ्याची तारांबळ उडते; की त्याला काय सांगावे हेच समजत नाही.
   आता तुमच्या मनात आले असेल की असा कोणता विषय आहे जो शिकणार म्हंटल्यावर लोक आपल्या मागे लागतील. तर हा विषय आहे "ज्योतिष". नुसते ज्योतिष शिकतोय असे म्हंटले की लोक लगेच विचारतात कोणता प्रकार? मग कोणी हात दाखवू लागते तर  कोणी पत्रिका. त्यांना लगेच घाई होते की कधी एकदा समोरची व्यक्ती  आपले भविष्य सांगेल.जर  त्याला सांगितले की 'अरे आता तर शिकायला सुरवात केली! तर लगेच म्हणतो ' ते ठीक आहे पण काहीतरी तर कळत असेल ना,  सांगा की जरा '. अश्या वेळी कळत नाही हसावे की रडावे.         

इ साहित्य -एक नजराणा

     मी वाचाळ गटात मोडणारी, आता तुम्ही म्हणाल हे काय प्रकरण असते? तर मी एवढेच सांगीन कि प्रत्येकाला कसली तरी आवड नक्की असते.  तर मला वाचायची आवड आहे. मला वाचन आवडते म्हणून वाचाळ.  म्हणजे पुस्तकांची डाय हार्ड फॅन बर का. पुस्तक दिसले कि ते वाचल्याशिवाय चैन हि पडत नाही आणि मोह सुद्धा आवरत नाही. मग मी शोधत राहते नवीन नवीन वाचण्याच्या पद्धती,तुम्ही  सुद्धा आता विचारात पडला असाल ना म्हणजे काय असते. म्हणजे छापील पुस्तकच नाही तर इ -पुस्तके आणि अगदी ऑडिओ पुस्तके सुद्धा मी आवडीने वाचते आणि ऐकते. आता तर पुढे जाऊन या पुस्तकांच्या लेखकांचे इंटरव्ह्यू घ्यायचा सुद्धा विचार आहे. पण त्याही पेक्षा माझ्यासारख्या वाचाळ मित्रांना एकत्र आणण्याचा माझा मानस आहे.
   अरे हो पण हे सगळे सांगताना मूळ मुद्दा बाजूला राहिला. अश्या वाचन वेड्या लोकांना एकत्र आणणारा ग्रुप म्हणजे इ- साहित्य. दर्जेदार पुस्तके आणि ती हि मोफत. मी तर हि पुस्तके वाचून खूप फिदा झाले आहे ह्या प्रकल्पावर. एकाच वेळी दीड  लाख लोकांपर्येन्त पोचणाऱ्या या साहित्य यज्ञात तुम्ही हि नक्की सामील व्हा.  

http://www.esahity.com/             


Thursday, July 21, 2016

बकेट लिस्ट -जॅक निकोल्सन, मॉर्गन फ्रीमन

       एक दिवस सकाळी उठल्यावर तुम्ही कामाला गेलात आणि तुम्हाला फोन येतो कि तुम्हाला कॅन्सर झाला आहे काय वाटेल तुम्हाला.  अशीच सुरवात होते या सिनेमाची आणि उलगडत जातो २ वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या कॅन्सर पेशंट चा प्रवास.
        रोज चे  झालेले औषधोपचार,  असह्य होत जाणारा त्रास, आजूबाजूंच्यांची सहानुभूती, लोकांचा बदललेला अँप्रोच, भेटायला येणारे नातेवाईक हे सगळे चालू होते. ह्या दोन पेशंट ची मैत्री होते. आणि हळू हळू  एकमेकांची विचारपूस सुरु होते. कोल हा एक बिझनेसमॅन आणि कार्टर हा एक मेकानिक. घर, नातेवाईक, आयुष्यातील निरनिराळे प्रसंग एकमेकांबद्दल चौकशी सुरु होते. केमोथेरपि चे त्रास हे सगळे सुरु होते. दोघांनाही सांगितले जाते कि आता त्यांचे  आयुष्य जास्तीत जास्त ६ महिने बाकी आहे .हे ऐकल्यावर दोघांना त्रास होतोच. ते अस्वस्थ होतात.
    एक दिवस कार्टर एक लिस्ट तयार  करतो ज्याला तो बकेट लिस्ट म्हणतो . पण २-३ गोष्टी लिहिल्यावर त्याचा इंटरेस्ट निघून जातो आणि तो कागद फेकून देतो. तो कागद कोल  च्या हाती लागतो आणि तो हट्ट धरतो कि आपण मिळून हि लिस्ट कंप्लिट करावी. कार्टर ची बायको अडवायचा प्रयत्न करते पण तो म्हणतो इतकी वर्ष मी इतरांसाठी जगलो आता मी स्वतःसाठी जगणार आहे.आणि सुरु होतो एक प्रवास मृत्यू आधी आवडत्या गोष्टी पूर्ण करण्याचा.
     
   हा सिनेमा  आपल्या सगळ्यांसाठी एक वेगळाच धडा देणारा आहे. कारण जो पर्येंत आपल्याला मरणाची वेळ माहित नसते आपण सगळ्या गोष्टी उद्यासाठी किंवा भविष्यासाठी ठेवत असतो. आणि अचानक जाणवते आपल्या कडे आता वेळ च नाही तेव्हा जाणवते कि बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या. आणि मग सुरु होते आपली धावपळ आवडत्या गोष्टी पूर्ण करण्याची.
 मृत्यूनंतरची शांतता  भीतीदायक वाटते. एक रिकामपण येते , सगळे बरोबर असण्याची गरज अचानक संपून जाते.  म्हणूनच आज पासून जगायला सुरवात  करा आणि आवडत्या  गोष्टींचा आस्वाद घ्यायला  विसरू नका
                        

Monday, July 18, 2016

अवंतीची डायरी - डॉ स्वाती गानू

अवंतीची डायरी एक छान मुलीची  दैनंदिनी. हे ऑडिओ पुस्तक ऐकताना असे वाटले की पुन्हा एकदा बालपणात परत गेल्यासारखे वाटले. आई, वडील, बहीण, भावंडे, आजी, आजोबांबरोबर चे छान प्रसंग पुन्हा एकदा आठवून गेले. आई बाबांच्या बरोबर केलेल्या सहली, शाळेतील मैत्रिणी सगळ्या गमतीजमती इतक्या सुंदर वाटत होत्या की असे वाटते अवंती बरोबर आपण ही त्या सगळ्या ठिकाणी  फिरत आहोत. कोकणची गम्मत ऐकली की आंबे खाणे, समुद्रावर जाणे याची आठवण लगेच येते. अवंती मोठे होत असताना तिच्यात होत जाणारे बदल ऐकले की अगदी ८-९ वीत असताना आम्ही कश्या वागत होतो त्याची आठवण येते. त्या वयातले अल्लडपणा आई वडिलांचे सल्ले देणे आणि ते कसे बोर करतात असा आमचा दृष्टीकोन सगळे अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. लहान मुले आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे कसे निरीक्षण करत असतात ते ही बारिकपणे हे त्यातून समजून आले. चांगले वाईट प्रसंग आणि त्यातील त्यांची आणि त्यांच्या आई बाबांची बाजू सगळे ऐकून असे वाटते की हा प्रत्येक पिढीत घडणारा सनातन वाद आहे. मीच बरोबर असे म्हणणारे आई बाबा आणि समजूतदार आई बाबा दोन्ही इथे दिसत राहतात. मुले ही आपल्या वागण्याचे स्वतःच्या कुवतीनुसार विश्लेषण करत राहतात. बऱ्याच वेळेला आई बाबा आणि मुले यांच्यात संवाद कमी पडतो असे दिसून येते. जरूर ऐकण्यासारखी आहे ही गोष्ट

http://www.esahity.com/2321233723672323.html              

अभ्यास सहल

      अभ्यास सहल म्हणजे मजा मस्करी शिकणे सगळेच काही असते.  आमचे शिक्षक त्यांच्या ग्रुप बरोबर ईशान्य भारत येथे  गेले होते तो प्रसंग त्यांनी आम्हाला सांगितला होता. तो प्रसंग अगदी त्यांच्या शब्दात इथे देत आहे.
    आमचा एक ग्रुप अभ्यास सहली साठी ईशान्य भारत येथे जाणार असे ठरले.या सहलीमुळे आमची आयुष्ये बदलतील असे आम्हाला वाटले ही नव्हते.   आम्ही सगळे फार उत्साहित होतो. तिथे गेल्यावर आमचे वेगवेगळे ग्रुप पाडून आम्हाला वेगवेगळ्या गावी पाठवण्यात येणार होते. इथून निघताना काही फार माहिती नव्हती आम्हाला की तिकडे कसे आणि कोणते अनुभव आम्हाला येणार आहेत. असाच एक थरारक अनुभव आमची तिथे वाट बघत होता.
        आम्ही मुंबईतून निघालो आणि मजल दरमजल करत नॉर्थ इस्ट च्या आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोचलो. तिथे भारतातून वेगवेळ्या राज्यातून माणसे अभ्यास सहलीसाठी आली होती. सगळ्या राज्यातील माणसांचे मिळून गट पडले गेले आणि आम्हाला नॉर्थ इस्ट मधील वेगवेगळ्या राज्यात पाठवले गेले. त्या वेळी नॉर्थ इस्ट मधील राज्यात अशांतता होती. भारतीय लोकांकडे ते लोक संशयाच्या नजरेने पाहायचे.
      आमचा ग्रुप एकदम    जिंदादिल होता. एकमेकांशी मस्करी चालली होती. आम्ही ज्या गावी जाणार होतो   तो डोंगराळ भाग असल्यामुळे बस शिवाय दुसरा मार्ग नव्हता.आमच्यासाठी एक बस ठरवली गेली. पण झाले असे की आमच्या ग्रुप मध्ये एक सरदारजी होते ते म्हणाले अरे बस मे तो व्हिडिओ वगैरे नहीं है.  इतना लंबा सफर कैसे करेंगे? दुसरा बस लेते है. बाकी सगळे ग्रुप मेम्बर सुद्धा तयार झाले. त्यामुळे आम्ही त्या बस ने जाणे रद्द केले. दुसरी बस मिळण्यासाठी वेळ लागणार होता म्हणून आम्ही तिथेच विश्रांती घ्यायची ठरवली.
      दुसरा दिवस उजाडला आणि ती भयानक बातमी आमच्या कानावर आली. जी बस आम्हाला घेऊन जाणार होती त्या बस मधले सगळे प्रवासी माओ वादि लोकांच्या हाती लागले आणि त्यांची निर्घृण हत्या केली गेली होती. ही बातमी कळताच सगळ्याच्या अंगावर काटा आला. त्या क्षणी असे वाटले की आपण त्या बस मध्ये असतो तर आज आपण जिवंत राहिलो नसतो. ही बातमी ऐकून ग्रुप मधील काही जणांना एकदम ताप भरला.    ग्रुप ने त्या सरदारजी ना धन्यवाद दिले की त्यांच्यामुळे आज सगळ्यांचे जीव वाचले. त्यानंतर कळले की   दुसऱ्या खेड्यात गेलेल्या ग्रुप ला सुद्धा स्वतःजवळचे सामान टाकून देऊन पळून यावे लागले होते.

    त्या प्रसंगानंतर आमची अभ्यास सहल सुरक्षित वातावरणात पार पडली. तिथल्या वातावरणाची तिथल्या माणसांची भारताबद्दलची त्यांची मते जाणून घेण्याची आम्हाला संधी मिळाली. पण या एक प्रसंगाने आमच्या सगळ्यांच्या मनात ही अभ्यास सहल कायमची कोरली गेली. आज वीस वर्षे झाली पण अजुनी तो प्रसंग मनात तसाच ताजा आहे.  

Friday, July 15, 2016

मोनालिसा -एक धमाल ग्रुप

             मुलींचा ग्रुप टिकेल का नाही अशी शंका सगळेच घेतात. पण आमचा हा मुलींचा ग्रुप तयार झाला तो आमच्या मित्रामुळे त्याने पुढाकार घेतला आणि आम्ही त्याच्या मैत्रिणी एकत्र आलो. एकमेकांना अनोळखी असलेल्या आम्ही हळूहळू एकमेकींशी छान गप्पा मारू लागलो. धीट लाजऱ्या बुजऱ्या सगळ्या प्रकारच्या मैत्रिणी आहेत ग्रुप वर आणि आम्ही सगळ्या छान सुखाने नांदू लागलो आहोत. एकमेकींची मस्करी करणे आम्हाला छान जमू लागले आहे. एकमेकींना जाणून घेण्यात रस येऊ लागला आहे. सगळ्यांची कार्यक्षेत्र वेगळी असली तरी गप्पा मारण्यात छान मजा येऊ लागली आहे.
       माझा तर हा पहिलाच मुलींचा ग्रुप. त्यामुळे माझ्यासाठी खास असलेला. आम्ही भेटलो तेव्हा असे वाटले सुद्धा नाही की पहिल्यांदा भेटतोय अगदी बरीच वर्ष आमची मैत्री असावी असे वाटले. वॉटर पार्क च्या सहलीमध्ये तर एकमेकांना भिजवून टाकण्यात इतकी धमाल आली की सांगता येणार नाही. मी तर पहिल्यांदा पाण्यात उतरायला घाबरत होते पण माझ्या मित्र आणि मैत्रिणींनी इतके छान सामावून घेतले मला की माझी पाण्याची भीतीच गेली. आता सुद्धा ग्रुपवर गप्पा गाणी गोष्टी कोडी यांची रेलचेल असते. कोडे घातले की ते सोडवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होते. खूप छान माहिती सुद्धा शेअर होते.  थँक्स संजय साठी ज्याने आम्हाला एकत्र आणले. 

            

Tuesday, July 12, 2016

प्रवास

          प्रवास नवीन अनुभव देतो,गोष्टी शिकवतो आणि महत्वाचे म्हणजे नवीन माणसे त्यांच्या वृत्ती दाखवतो. अगदी आपला देश फिरताना सुद्धा वेगवेगळ्या भाषा आणि त्यांची मजा अनुभवता येते.
          असाच एक प्रवास मी केला. आजही त्या प्रवासाची आठवण आली की अंगावर काटा येतो. माझी  परीक्षा झाली होती. नेहमीसारखे मी आई आणि बाबा प्रवासाला निघालो. या वेळी मनाली, शिमला असा उत्तरेकडचा प्रवास होता. दिल्लीहून आम्ही कालकास्टेशनला पोचलो. त्यानंतर  ते शिमला प्रवास इतका नयनरम्य होता  की डोळ्याचे पारणे फिटले, अगदी माथेरानला जशी छोटी ट्रेन  असते तशीच ट्रेन तिथे  असते.  तिथे इतके छान सौंदर्य दिसते की असे वाटते की ट्रेन मधून उतरूच नये. त्यानंतरकुलू शिमला आणि मनाली   फिरून झाले.निसर्गाचे  लेणे लाभले आहे या भागाला. बर्फात खेळताना फार मजा आली. त्यानंतर आम्ही धर्मशाळा या ठिकाणी जायला बसमधून निघालो. प्रवास दिवस आणि रात्रीचा होता. दिवसभर माणसे चढत उतरत होती. रात्री मात्र अगदी मोजकी ६ माणसे बस मध्ये होती.  मी, आई, बाबा , बसचा कंडक्टर, ड्राइव्हर आणि अजून एक त्यांचा मित्र एवढेच होते. रात्रीचे जेवण झाले. सगळे अगदी पेंगुळले होते.
                 बसचा कंडक्टर मागच्या सीटवर जाऊन झोपला. मी आणि बाबा सुद्धा झोपलो. बस मध्ये फक्त ३ माणसे जागी होती  माझी आई, बस चा  ड्राइव्हर आणि त्याचा मित्र. ती अमावस्येची रात्र होती आणि त्या दिवशी  ग्रहण सुद्धा होते. सगळे म्हणत होते आज शक्यतो प्रवास करू नका. पण पुढचे रिझर्वेशन झाले असल्यामुळे आम्हाला जाणे भाग होते. रस्ता ही सुनसान होता. रस्त्यावर लाईट सुद्धा नव्हते. फार भयाण वाटत होते. ड्राइव्हरला सुद्धा हळू हळू झोप येऊ लागली होती आणि एक वळण आले.  अचानक ड्राइव्हर च्या मित्राने सिगरेट पेटवण्यासाठी काडी पेटवली आणि ड्राइव्हरला त्या प्रकाशात वळण दिसले. त्याने पटकन बस वळवली. हा सगळं प्रसंग आईने पहिला होता. आम्ही तर सगळे झोपेत होतो. पण आईने तो प्रसंग अनुभवला होता. तिच्या छातीत अगदी धस्स झाले. भल्या पहाटे आम्ही धर्मशाळा येथे उतरलो तेव्हा आईने हा प्रसंग आम्हाला सांगितला तेव्हा आम्ही अगदी भयचकित झालो आणि देवाचे आभार मानले की त्या माणसाने काडी पेटवली नसती तर आज काय झाले असते. पण आता मात्र जेव्हा या प्रसंगाची आठवण येते तेव्हा मी म्हणते की आयुष्याची  दोरी बळकट होती नाहीतर हा प्रसंग सांगायला या क्षणी मी जिवंत नसते हो.... !                           

सोशल साईट वरची मैत्री

               सोशल साईट वरची मैत्री किती टिकेल याची काही खात्री देता येत नाही. तो भेटला असाच एक  सोशल साईट वर आणि मग सुरू झाल्या आमच्या गप्पा. आम्हाला दोघांना ही गप्पा मारायला खूप आवडतात हे ही कळले. हळू हळू आमच्या काही आवडी निवडी सुद्धा जुळतात हे कळले आणि छानच वाटले. तो तसा  बिनधास्त मनातले पटकन सांगणारा कधी रुसणारा कधी रागावणार छान मनमोकळे वागणारा. त्याची माझी मैत्री कधी झाली कळलेच नाही. मग व्हाट्स अँपवरच्या गप्पा सुरू झाल्या. मी भेटावे असा त्याचा आग्रह आणि मी फक्त हो हो म्हणत राहिले.
              एक दोनदा भेटेन म्हंटले आणि आयत्यावेळी नाहीच म्हणले. मग एकदा तलावपाळी च्या इथे भेट झाली आणि इतक्या गप्पा झाल्या की वाटले आम्ही वर्षानुवर्षे एकमेकांचे मित्र आहोत. एक छान फीलिंग आले. मग आमच्या गप्पा सुरू राहिल्या.  आणि छान विश्वास निर्माण झाला आमच्यात. तो छान लिहितो आणि त्याच्यामुळे मी सुद्धा ब्लॉग लिहू लागले आहे. त्या सोशल साईट चे अगदी धन्यवाद त्याच्यासारखा छान मित्र मला मिळाला. आता तर आम्ही रुसतो रागावतो कधीतरी लहान मुलांसारखे भांडतो सुद्धा आणि मग हसतो सुद्धा. मला खूप लकी वाटते आहे त्याच्यासारखा मित्र मिळाला म्हणून.          

Saturday, July 9, 2016

लपवलेल्या काचा -डॉ सलील कुलकर्णी

        सलील कुलकर्णी एक संगीत दिग्दर्शक खूप हळवा मनस्वी वाटणारा. त्याचे लिखाण त्याच्यासारखे मुक्त असलेले . या पुस्तकात तो मांडतो आपल्या आयुष्यातल्या त्या हळव्या जागा ज्या जगायच्या राहून च गेल्या. ते प्रसंग मांडताना अगदी हळुवार होऊन जातो त्याची गाणी जशी हलकेच आपल्याला ताब्यात घेतात तसेच त्याचे लिखाण ही हळुवार पणे मनात सामावून जाते.
       पुस्तक हातात घेताना कल्पनाच नसते की इतके हळुवार काहीतरी हाती लागणार आहे . आणि पुस्तक ठेवताना आठवतात त्या आपल्या  आयुष्यातले हळुवार प्रसंग जे पुन्हा जगावे आणि त्यात काही छान बदल घडवून त्यातून एक छान आठवणींचे पुस्तक तयार व्हावे.हळवे अस्वस्थ करून टाकते हे पुस्तक म्हंटले तर विशेष गोष्टी नसलेले तरी ही आयुष्यातील असंख्य नव्या अनुभवांचे गाठोडे आपल्यापुढे मांडून ठेवणारे प्रसंग यात मांडलेत.          

माझी आवडती पुस्तके

  1. एक होता कार्व्हर -विना गवाणकर 
  2. वॉर्ड नं ५ के इ एम -डॉ रवी बापट 
  3. सोनेरी टोळी - नाथमाधव 
  4. शोधयात्रा- विदुर महाजन 
  5. हसरे दुःख - भा द खेर 
  6. ऑस्कर पिस्टोरियस -गियांनी मेरलो  अनुवादक -सोनाली नवांगुळ 
  7. ब्रेडवीनर -डेबोरा एलिस - अनुवादक - अपर्णा वेलणकर 
  8. परवाना  -डेबोरा एलिस - अनुवादक - अपर्णा वेलणकर 
  9. बकुळा - मूर्ती अनुवादक -लीना सोहनी 
  10. इजिप्तायन -मीना प्रभू 
  11. दक्षिणरंग-मीना प्रभू 
  12. मेक्सिकोपर्व -मीना प्रभू 
  13. माझे लंडन -मीना प्रभू 
  14. चिनी माती -मीना प्रभू 
  15. तुंबाडचे खोत  -श्री ना  पेंडसे 
  16. माझी पाकिस्तानातील हेरगिरी -मोहनलाल भास्कर 
  17. व्यक्ती आणि वल्ली - पु ल देशपांडे 
  18. बटाट्याची चाल -पु ल देशपांडे 
  19. अपूर्वाई -पु ल देशपांडे 
  20. पूर्वरंग-पु ल देशपांडे 
  21. असा मी असामी -पु ल देशपांडे 
  22. नागझिरा-पु ल देशपांडे 
  23. एक रानवेड्याची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे 
  24. रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर 
  25. स्वामी -रणजित देसाई 
  26. श्रीमान योगी -रणजित देसाई 
  27. राधेय -रणजित देसाई 
  28. कनेक्ट द डॉटस -रश्मी बन्सल अनुवाद 
  29. स्टे हंग्री स्टे फुलिश -रश्मी बन्सल 
  30. रूपवेध - श्रीराम लागू 
  31. मुसाफिर - अच्युत गोडबोले 
  32. प्रदीप लोखंडे पुणे -१३- प्रदीप लोखंडे 
  33. माझेही एक स्वप्न होते -वर्गीस कुरियन अनुवाद -सुजाता देशमुख 
  34. मृत्युन्जय -शिवाजी सावंत 
  35. ययाती - वि स खांडेकर 
  36. वपुर्झा -व पु काळे 
  37. हाच माझा मार्ग -सचिन पिळगावकर 
  38. झोंबी - आनंद यादव 
  39. घरभिंती - आनंद यादव 
  40. नांगरणी -आनंद यादव 
  41. नाथ हा माझा -कांचन काशिनाथ घाणेकर 
  42. निलांगीनी -स्मिता पोतनीस 
  43. अनुदिनी -दिलीप प्रभावळकर 
  44. झिम्मा -विजय मेहता 
  45. फकीर -रुझबेह भरुचा अनुवाद सुनीती काणे 
  46. काठ -डॉ एस एल भैरप्पा अनुवाद -उमा कुलकर्णी 
  47. व्हाया वस्त्रहरण -गंगाराम गवाणकर 
  48. परिक्रमा नर्मदेची -नारायण अहिरे 
  49. पाणी ते पाणी -अभिजित घोरपडे 
  50. लपवलेल्या काचा -डॉ सलील कुलकर्णी 
  51. चित्रपट सृष्टीतील महानायिका -मधुबाला -डॉ श्रीकांत मुंदरगी 
  52. माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर 
  53. बर्मुडा ट्रँगल -विजय देवधर 
  54. प्रिय जी ए - सुनीता देशपांडे 
  55. आहे मनोहर तरी -सुनीता देशपांडे 
  56. चिखल घाम आणि अश्रू -बेअर ग्रिल्स अनुवाद -अनिल /मीना किणीकर 

Friday, July 8, 2016

सोनेरी टोळी -नाथमाधव

          नाथमाधव यांचे सोनेरी टोळी हे पुस्तक वाचकाला गुंतवून ठेवणारे किंवा खिळवून ठेवणारे पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरवातीपासून च प्रत्येक क्षणी एक नवीन धक्का आपल्याला चकित करून टाकतो. यातील प्रत्येक गोष्ट अगदी रंगवून आणि खुलवून सांगितली आहे. रायाक्लब आणि त्याच्या वेगवेगळ्या करामती म्हणजे थक्क करणारा नमुना आहे. इंग्लिश लेखक  शेरलॉक होम्स  जश्या कथा लिहीत असेल तश्या दर्जाची रहस्यमय आणि उत्कंठावर्धक अशी कादंबरी आहे . या कादंबरीच्या निमित्ताने  माणसांचे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. त्याशिवाय ठकसेनचे वेगवेगळे प्रकार त्यांच्या फसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा तपशीलवार पने कळून येतात. माणसातील राग लोभ सुख दुःख आनंद या भावनांचे यात दर्शन होते  माणूस  कसा मोहाला  बळी पडतो हे ही यात दिसून येते.

        आणि हे सगळे वाचताना  आपण अगदी गुंग होऊन जातो. प्रत्येक प्रसंग संपला की पुढे काय होईल याची सतत उत्कंठा लागून राहते. कथेतील वाचकांचा रस टिकवून ठेवणे हेच या कादंबरीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल       

शोधयात्रा- विदुर महाजन


हे पुस्तक मी वाचायला घेतले ते खास शमा पांडे यांनी सांगितल्यामुळेच. पुस्तक वाचायला सुरवात केल्यावर त्यातले साधेपणा इतका भावला की पुस्तक एक बैठकीत वाचून कधी संपले हे कळलेच नाही.
  शोधयात्रा -श्री विदुर महाजन यांचे पुस्तक, स्वतः एक सतारवादक असेलेले  ज्यांनी उद्योजक होण्याचे धाडस दाखवले आणि या उद्योजक होण्यातल्या छोट्या मोठ्या बाबी समजून घेत त्यांनी व्यवस्थेतील माणसांशी सुद्धा दोन हात करून दाखवले. लाचखोरी ही भारतात उद्योगांच्या पुढचा सगळ्यात मोठा अडसर आणि त्याच गोष्टीच बिमोड करण्याचे धैर्य त्यांनी व्यवस्थेतील चांगल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने करून दाखवले.
    शोधयात्रा हा प्रवास आहे विदुर महाजन यांच्या उद्योग चालवणे त्यातील खाचखळग्यांचा विचार करून त्यात योग्य मार्ग शोधून काढणे, त्याच बरोबर माणसांशी वागताना येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांचे प्रतीक यांचा आहे. या प्रवासात त्यांना अनेक क्षेत्रातील चांगली वाईट माणसे भेटली त्याचे त्याने छान वर्णन यात केले आहे.  आणि उद्योग सुरू करताना किंवा सुरू झाल्यावर सुद्धा त्यांना अखंड साथ देणारी सतार कायम त्यांच्या आयुष्याचा  भाग कशी  बनून राहिली याचे सुरेल वर्णन . त्यांच्या घरच्या मंडळींनी ही त्यांना उत्तम साथ दिली
      एक साध्या सरळ कलात्मक माणसाचा हा सुंदर ओघवत्या शैलीचा हा प्रवासानुभव           

Tuesday, July 5, 2016

सखा

          आज कपाट  उघडले आणि सेंट ची बाटली हाती लागली. आणि त्याची प्रकर्षाने आठवण झाली. मी मनात त्याला नेहमी सखा म्हणते. सतत मनात रुंजी घालणारा . तो वयाने मानाने दोन्ही ने माझ्यापेक्षा मोठा. पण आमचे खूप छान जुळायचे. आम्ही खूप वेगवेगळ्या विषयावर गप्पा सुद्धा  मारायचो सिनेमा असो की राजकारण अगदी अध्यात्म सुद्धा आम्हाला वर्ज्य नव्हते. पण आता काही तो माझ्या बरोबर नव्हता. तो कामासाठी दुसऱ्या शहरात जाऊन स्थायिक झाला होता. आता फक्त होत्या त्याच्या आठवणी आणि त्याचे येणारे व्हाट्स अँप वरचे मेसेज.
           आज ही आठवतो आहे मला आमच्या भेटीचा तो पहिला दिवस. लोकांमध्ये नाव कमवून असलेल्या माणसाशी होणारी पहिलीच भेट होती ती . पण तो इतका साधा सुद्धा हसमुख आणि समजूतदार पणे  वागला की हळू हळू आमची मैत्री कधी झाली कळले सुद्धा नाही मला. मीच बऱ्याच वेळा हट्ट करायचे की आता बोलायचे आहे पण कधी तो कामात असेल याची काही काळजीच नाही मला. पण तो फार समजूतदार नंतर बोलीन हा आता कामात आहे असे शांतपणे सांगायचा .
            काही महिन्यापूर्वी असाच रस्त्यात अचानक भेटला आणि म्हणला एक गुड न्यूज आहे सांगू! मी म्हणले सांगा ना किती छान. मला एक नवीन असाइनमेंट मिळाली आहे. मी लगेच विचारले कुठे कसली
? माझे प्रश्न काही थांबेना. तो म्हणाला अग हो सांगतो सांगतो. मग त्याने सांगितले मला एक जे हवे होते ते काम करायला मिळते आहे  पण मला तिथे २ वर्षासाठी शिफ्ट व्हावे लागेल. मग मी परत येईन. ओह हे ऐकल्यावर मला एकदम कळेचना कसे व्यक्त व्हावे. एकाच वेळी मला आनंद ही झाला होता की त्याला हवे ते करायला मिळते  आहे म्हणून आणि दुसरीकडे आता पूर्वीसारख्या गप्पा आणि भेटी होणार नाहीत याची हुरहूर लागली होती. तसे मी कसे आहे सगळे तिकडे काम जमेल का ?हवामान सूट नाही झाले तर ? असे बरेच प्रश्न विचारून पाहिले. असे वाटले एकदा त्याला थांबवावे सांगावे तु तिकडे गेलास की मी काय करायचे एवढा छान मित्र शोधून नाही सापडणार. मनातले हे विचार बाजूला ठेवून मी त्यांचे अभिनंदन केले आणि मग तो निघून गेला. मी घरी आले आणि असे वाटले की एकदम सगळे भकास झालेय. थोडी मनाची समजूत घालायला वेळ लागला पण मग म्हंटले मी त्याची चांगली मैत्रीण आहे म्हणजे त्याला मी मोकळीक द्यायला हवी. त्याने फक्त माझ्याशी बांधून घ्यावे असे तर मैत्रीचे नाते कधीच नसते हा विचार मनात आल्यावर जरा शांत वाटले                
        त्याचा जाण्याचा दिवस ठरला. तो म्हणाला भेटणार आहेस का. आम्ही भेटलो गप्पा झाल्या आणि मग निघताना एक छान सेंट ची बाटली त्याने मला दिली त्याची आठवण म्हणून. मी निघाले आणि म्हणले स्वतःबद्दल कळवत राहा नवीन काय करतो आहेस ते. त्याला एकदम भरून आले मला म्हणला खूप बरे वाटले असे म्हणालीस असे वाटले कुणीतरी आहे इथे अजुनी जे माझ्या गोष्टी ऐकण्यासाठी तेव्हढे च उत्सुक आहे.        

व्हिझीट

घरी आलो,बॅग ठेवली आणि सोफ्यावर मटकन बसलो. बायको लगेच पाणी घेऊन आली. दमलास ना खूप? मी नुसतेच मानेने हो म्हंटले. कपडे बदलले आणि काही सुद्धा न बोलता पटकन झोपून गेलो.
सकाळ झाली उठलो पाहिले तर बायको रागावली आहे असे दिसले. मग भराभर माझे आटोपून घेतले आणि मग तिला विचारले काय झाले ग रागावली आहेस का ग? ती काही बोलेचना. मग पुन्हा २-३ वेळा विचारल्यावर म्हणाली किती उशीर झाला काल? काही स्वतःची काळजी आहे का नाही? नुसते काम आणि काम.
   सॉरी ग काय करणार काल ७-८   व्हिझीट  होत्या मग क्लिनिक ची वेळ संपल्यावर त्या पुऱ्या करे पर्येंत एवढा उशीर होणारच ना. त्यात सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या कुठेच लिफ्ट नाही मग जिने चढून जीव अगदी मेटाकुटीला आला होता. त्यात हा तुफान पाऊस पण जावे तर लागणारच होते. सगळी म्हातारी माणसे त्यांना क्लिनिक ला येणे सुद्धा शक्य होत नाही. मग काय सगळीकडे जिने चढ उतार करायचे मग पेशंट ला बघायचे औषध किंवा इंजेक्शन द्यायचे. आणि एवढे करून पेशंट च्या नातेवाईकांचे हजार प्रश्न त्याची उत्तरे द्यायची जीव अगदी थकून गेला होता काल तुझ्याशी बोलण्याचे सुद्धा त्राण नव्हते उरले माझ्यात. बर म्हातारी माणसे म्हणजे त्यांना नाही सुद्धा म्हणता येत नाही. सगळ्यांना वाटते डॉक्टर   व्हिझीट  च्या नावाखाली अवाच्या सव्वा फी उकळतात. पण आपले श्रम आणि आपली बुद्धिमत्ता हे त्यांना दिसत नाही याचे खूप वाईट वाटते.
    अरे हो तू म्हणतोस ते खरे आहे पण तुझी तब्येत सुद्धा जपायला नको का? पेशंट ना बघता बघता तू नको आजारी पडूस. मग मी मस्त हसलो आणि बायकोला म्हणलो अग मी नाही आजारी पडत ग. काळजी घेतो मी स्वतःची. आणि मला काही त्रास होत असेल तर तू आहेस ना माझी डॉक्टर.  आणि ती अशी लाजली की सगळेच काही सांगावे लागत नाही हो.                     

Monday, July 4, 2016

आज जाने की जिद ना करो - फरीदा खानुम

मी रोज आवडती गाणी ऐकत असते. नवीन नवीन गाणी येतात ती ही माझ्या यादीत सामील होत असतात. पण काही गाणी मात्र काळजात घर करून जातात. ती ऐकली की वाटते हाय काय दर्द  आहे गाण्यात.  माझ्यासाठी तर हे गाणे म्हणजे अप्रतिम ट्रीट च आहे. एक प्रेयसी प्रियकराला किती प्रकारे विनविते.  प्रत्येक शब्द अगदी हृदयाला भिडतो आणि वाटते की त्या आपल्या समोर बसून आपल्याला त्या विरहिणीची व्यथा सांगत आहेत. तिचे ते प्रियकराला जाण्यापासून थांबवण्याचे प्रयत्न अगदी दृश्यमान होते. यु ट्यूब वर जरूर हे गाणे ऐका. कान  तृप्त होऊन जातील. आणि आपल्या आयुष्यातील हळव्या प्रेमाची नक्की पुन्हा एकदा आठवण होईल.

https://www.youtube.com/watch?v=wqbbILfdw94     

उत्तर

आपण शिकली सावरलेली माणसे सहज विचार करतो की आपल्याला सगळे कळते. काही विचारले तर पटकन उत्तर देऊ असा आपला गैरसमज असतो. आणि मग कधीतरी असे काही घडते की कळते आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाही देता येत याची जाणीव आपल्याला होते. 
आज सकाळी बेल वाजली आणि मी दार उघडले आमच्या कडे भांडी घासणाऱ्या बाई त्यांच्या मुलीबरोबर आल्या होत्या. ५ वर्षाची स्मार्ट चुणचुणीत मुलगी होती ती. सारखी आईच्या भोवती भोवती करत होती. एक जागी शांत काही बसत नव्हती. आणि तिची आई काम करता करता तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. आई मुलीचा अगदी सुख संवाद चालू होता. मुलगी प्रश्न विचारून भंडावून सोडत होती. आईने म्हंटले ही की अग जरा शांत बस. पण हिची आपली बडबड सुरू. आई आज शाळेत हे शिकवले मग तू खाऊ कधी आणणार आहेस मग हाच खाऊ हवा. मला तर कळेना कश्या ह्या रोज हिच्या प्रश्नांची उत्तरे देत असतील. आई ने सांगितले म्हणून पाच मिनिटे ती बाहेर येऊन बसली. त्याचे कपडे धुऊन झाले आणि मग ही परत आईजवळ जाऊन म्हणते किती वेळ लागणार आहे ग तुला लवकर चल ना. आणि अचानक तिने आईला एक प्रश्न विचारला आणि मी चकित च झाले. एवढीशी पोर पण तिच्या प्रश्नाचे उत्तर तिच्या आईला देणे अवघड होऊन बसले. ती विचारात होती आई तू दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी का करतेस ग? आणि आमच्या बाई च काय पण माझ्या ही गळ्यांत आवंढा दाटून आला. काय उत्तर द्यावे या मुलीला ?परिस्थिती शिक्षण की जगण्याची धडपड यातले काय कमी पडले असावे. तिच्या आईने तिला मोठा खाऊ घेऊन देईन असे आश्वासन दिले आणि उत्तर देण्याचे टाळले. पण त्यानंतर त्या मुलीशी नजर मिळवण्याचा  मला काही धीर होईना.                        

कविता

            आज एक कविता सुचली विचार केला त्याला वाचून दाखवावी. तो बिझी होता मग दुसऱ्या मित्रांना वाचून दाखवली त्यांना आवडली. दिवसभर या आनंदात होते मी. आणि अचानक त्याचा संध्याकाळी फोन आलाकाय छान वाटले मला, मी खुश   इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग त्याला सांगितले की एक कविता केलीय वाचून दाखवू का? तो ही खुश बरेच दिवसांनी तो कविता ऐकत होता. मागची कविता ऐकून सुद्धा महिना झाला होता. कविता वाचून दाखवली मी आणि विचारले कशी आहे तर तो शांत उत्तरच देईना. मग म्हणाला तुला वाईट वाटेल नको राहू दे. मग मी विचारले आवडली नाही का तर म्हणाला कविता तशी बरी आहे पण तुझी  पहिल्यांदा कविता ऐकली होती त्याची मजा यात नाही. मी विचारले म्हणजे काय. तर त्याचे म्हणणे असे की तुझ्या आजच्या कवितेत    कुठे तरी काहीतरी मिसिंग आहे काहीतरी. काय मिसिंग आहे असे विचारले तर म्हणतो की माझ्या कवितेचा आत्मा हरवलाय. अरे बापरे मला तर ऐकून धक्काच बसला. असे वाटले कुठून याला कविता ऐकवली. तो म्हणतो कविता संग्रह साठी फिट नाही ही कविता. मग मी म्हंटले कविता संग्रहासाठी नाही लिहित मी कविता. मी लिहिते स्वतःसाठी.असे म्हणून फोन ठेवून दिला मी. असा राग आला आणि खूप वाईट ही वाटले. असे वाटले काही कविता लिहू नये. काय उपयोग लोकांना आवडत नसेल तर. मग काय ठेवून दिली कवितेची वही. आणि मग व्हाट्स अँप च्या फॉरवर्ड केलेल्या कविता वाचत बसले. मग दुसऱ्या मित्राने समजावले अग प्रत्येकाची मते वेगळी एवढ्यात नको नाराज होऊ. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे सुधरायला मदत होते.मी  हे वाचता क्षणी माझी कळी खुलली हो.               

Saturday, July 2, 2016

क्षण

आज तो येणार म्हणून तिचे हृदय धडधडत  होते. तो येईल तेव्हा कसा बोलेल काय म्हणेल  याच्या विचाराने ती थोडी बेचैन झाली होती. बेल वाजली तो आला. एकदम साधा शांत तिला खूप आश्चर्यच वाटले लेखक आणि तो हि एवढा मोठा असून कसला गर्व नाही कि कसले हि टेन्शन नाही. इतका सहज होता तो. 
   छान गप्पा झाल्या आणि राणीला  अगदी तो जवळचा वाटू लागला. त्याला भेटल्यापासून तर तिला त्याची ओढ लागली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती त्याच्या मेसेज ची वाट  बघू लागली. सगळीकडे तिला तोच दिसू लागला. हे थोडे वेडेपणाचे होते पण काय करणार प्रेमात सगळे माफ असते ना. 
     मग काय राणी आणि राजा च्या गप्पा सुरु झाल्या तिला वाटू लागले त्यालाही हि ती आवडते पण कसे विचारायचे. तिला वाटले त्याचे किती चाहते असतील आपण हि त्यातलेच एक असे वाटत असेल त्याला. पण हळू हळू तो काही बोलू लागला कि तिला वाटायचे तिच्यासाठी आहे ते. तिचे मन अधीर झाले. त्याच्या मनात काय आहे ते जाणून घ्यावे असे वाटू लागले. 
     तो काही मनाचा थांगपत्ता लागू देत नव्हता. नुसता मला समजून घे असा हट्ट  धरून बसला. आणि मग राणी ने एक दिवस राजाला विचारलेच काय वाटते तुला माझ्याबद्दल  तर तो काही सांगेच ना. मग ती रुसून बसली. तिची समजूत काढांयला तो आला. ती काही ऐकायला तयार नव्हती. मग तो राणीला म्हणाला कि आज तुझी कविता वाचू या. ती कविता वाचू लागली. तिची कविता वाचताना त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि हळुवार पणे त्याचे चुंबन घेतले. ती हसली . त्याच्या कुशीत विरघळून गेली. त्याचा हात हातात घेऊन ती तो क्षण अनुभवत राहिली.