Thursday, August 11, 2016

कवितेचे स्टॅंडर्ड

           कविता ऐकणारे समजून घेणारे मिळणे हा अगदी दुर्मिळ योगायोग असतो. त्यात हि फार कमी मासिके कविता करणाऱ्यांना मान देतात,बऱ्याच वेळी त्यांना अपमान च सहन करायला लागतो. असाच एक कवीने सांगितलेला किस्सा आज सांगणार आहे मी तो हि त्यांच्या भाषेत.
         माझी पहिली कविता मासिकात छापून आली आणि मला अगदी आकाश ठेंगणे झाले  असे वाटले कि आपण आता सेलिब्रेटी झालो. लगेच या विचाराने हवेत तरंगू लागलो. माझ्या काही मित्रांना सुद्धा मी फोन करून सांगितले कि माझी कविता छापून आली नक्की वाचा. लगेच मला मी खूप मोठा झालो अशी स्वप्ने पडू लागली. मग असे वाटले माझी कविता छापणाऱ्या मासिकाचे काय स्टॅंडर्ड असतात कविता छापण्याचे ते तरी पाहूया म्हणून मी माझी नवीन कविता घेऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. तिथे गेल्यावर विचारले कि मला संपादकांना भेटायचे आहे. मग त्यांनी विचारले काय काम आहे? मी सांगितले कि कविता द्यायची आहे. मग त्यांनी सांगितले कि त्या समोरच्या खोक्यात टाका. पण तरीही मी म्हणलो कि मला त्यांना भेटायचे आहे. मग त्या माणसाने मला संपादकाचे केबिन दाखवले.
           मी दारावर टकटक केली.आत या असा आवाज आल्यावर मी आत गेलो. संपादकाने मान वर करून पहिले   आणि विचारले काय काम आहे? मी लगेच नाव सांगितले आणि कविता द्यायला आलो आहे असे सांगितले  . त्यांनी म्हंटले ठीक आहे तिथे ठेवून द्या. मी चकित मला ओळखलेच नाही. माझा थोडा हिरमोड झाला. मी तिथेच उभा आहे हे बघितल्यावर पुन्हा विचारले काय हवे आहे अजून? मी विचारले कि तुमचे कविता निवडीचे स्टॅंडर्ड काय आहेत? हा प्रश्न ऐकल्यावर त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्यांनी मला विचारले कि तुमची कविता किती ओळीची होती ७ ओळीची का? मी आठवून हो सांगितले. मग ते म्हणाले कि ती सात ओळीची होती म्हणून आम्ही छापली ती. डिझाईन च्या खाली जेवढी जागा आहे त्यात मावणारी कविता आम्ही छापतो. एरवी आम्ही फारश्या कविता छापत  नाही. हे ऐकल्यावर मला काय बोलावे तेच कळेना. मी हळूच दरवाजाबाहेर  पडलो. कविता फाडून टाकली आणि   तेव्हापासून मला कळले कि कवितेपेक्षा हि मासिके कथा कादंबऱ्यांना जास्त महत्व देतात.                       

        

No comments: