Showing posts with label पुस्तक परीक्षण. Show all posts
Showing posts with label पुस्तक परीक्षण. Show all posts

Wednesday, February 19, 2020

डेथ वॉज नॉट पेनफुल - श्री. धीरेंद्र सिंग जफा अनुवाद - वर्षा गजेंद्रगडकर अभिजित प्रकाशन


१९७१ च्या युद्धात सहभागी झालेले श्री.  धीरेंद्र सिंग जफा यांनी अनुभवलेले क्षण  या पुस्तकात नमूद केले आहेत. भारतीय एअर फोर्स मध्ये फायटर पायलट  म्हणुन  श्री.  धीरेंद्र सिंग जफा  यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १९७१ च्या युद्धात त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली.
  भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या या युद्धात त्यांचे विमान पाकिस्तान मध्ये कोसळल्यामुळे त्यांना युद्ध कैदी म्हणून पाकिस्तानच्या तुरुंगात राहावे लागले. पाकिस्तान तुरुंगात मिळणारी वागणूक,तिथले सैनिक, त्यांचा आवेश, युद्धकैद्यांना मिळणारी वागणूक हे सगळे वाचताना अंगावर रोमांच उभे राहते.
 युद्ध त्याचे विविध पैलू,त्यात खेळले जाणारे डावपेच, सैनिकांची यातील भूमिका हे वाचताना मन अस्वस्थ होते. आपले सहकारी कुठे असतील याची वाटणारी चिंता आणि ते भेटल्यानंतर होणार आनंद अवर्णनीय आहे.
युद्धात सैनिकांना काही ठरवण्याची मुभा नसते. फक्त ऑर्डर पाळणे हे त्याच्या हातात असते.

   युद्धकैदी म्हणून वावरताना त्यांना घरच्यांची येणारी आठवण, आणि युद्धामुळे उध्वस्त झालेल्या एका पाकिस्तानी तरुणीने दिलेली अचानक भेट यामुळे येणारी अस्वस्थता सुन्न करून टाकणारी आहे.

आम्ही जिंकणारच हा पाकिस्तानी  सैनिकांचा अविर्भाव आणि हरल्यानंतर येणारी शरमेची भावना लपून राहत नाही. घरी जाण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे चक्क पाकिस्तानी तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारे तिघे सहकारी आणि त्यांचा तो प्रवास चित्त थरारून टाकतो.

  युद्धात सहभागी होणारे जफा यांचे सहकारी, त्यांचे रोमहर्षक स्वभाव वाचताना एक निराळीच अनुभूती येते. पहिल्या युद्धात होणाऱ्या सहकाऱ्याला  सांभाळून घेताना करावी लागलेली मानसिक कसरत जफा यांच्या समजूतदार स्वभावाचे दर्शन घडवतात.

         

Tuesday, January 14, 2020

द सेव्हन्थ सीक्रेट - आयर्विंग वॅलेस - अनुवाद - विजय देवधर


आधुनिक इतिहास  विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ हॅरिसन ऐशक्राफ्ट यांना एकाच गोष्टीने झपाटून टाकले होते आणि ते म्हणजे  जर्मन हुकूमशहा एडॉल्फ हिटलर याचे  चरित्र "हेर हिटलर ".
 हेर हिटलर चे काम करत असताना त्यांना एक अनपेक्षित पत्र येते आणि त्यांच्या आयुष्याला एक निराळेच वळण लागते. त्यांना मिळालेली माहिती तपासून पाहण्यासाठी ते जर्मनीत दाखल होतात.
  आणि त्यांचा अपघात होतो. त्यांची मुलगी एमिली ऐशक्राफ्ट हे पुस्तकाचे काम करण्यासाठी आणि त्या संदर्भात शोध घेण्यासाठी जर्मनी  ला जायचे ठरवते. तिला हि एक पत्र येते. त्यात तिच्या वडिलांचा अपघात झाला नसून खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते.
   असे असून हि ती जर्मनीला जाण्याचे ठरवते. तिच्या या प्रवासात तिला रेक्स फॉस्टर हा आर्किटेक्ट,निकोलस किरवोव हा कलासंग्रहाचा व्यवस्थापक, पीटर निट्झ हा पत्रकार,तोवाह हि मोसाद ची एजन्ट हे  विविध टप्प्यावर भेटतात. आणि मग सुरु होतो एक थरारक प्रवास ज्यात त्यांची गाठ असते "नाझी सर्वश्रेष्ठ आहेत असे वाटणाऱ्या लोकांशी". त्यांना हुलकावणी देत रेक्स फॉस्टर आणि एमिली  पोचतात एका गूढ ठिकाणी जिथे त्यांची गाठ पडते एका अश्या स्त्री शी जी काळाच्या पडद्यावर केव्हाच नाहीशी झाली आहे. तिच्या  भविष्यातील विचित्र  योजना ऐकून त्यांचा थरकाप उडतो.  आणि मग सुरु होते त्यांची तिथून सुटण्याची धडपड

अतिशय चित्तथरारक आणि मनाची पकड घेणारी कादंबरी.  वेगवेगळे व्यावसायिक आणि त्यांची एकमेकांत गुंतलेली आयुष्ये एक वेगळीच खुमारी आणतात.  हिटलर आणि इवा ब्राऊन यांचे काय झाले हे गूढ उकलण्याचा एक वेगळाच प्रयत्न. 

Thursday, December 19, 2019

लास्कर पेलांगी - अँड्रिया हिराता (इंडोनेशिया) - द रेनबो ट्रूपस - अँजी किलबेन (इंग्रजी अनुवाद ) सप्तरंगी फौज - डॉ. मीना शेटे प्रभू (मराठी अनुवाद )


इंडोनेशियातील बेलिटांग  बेटावरील एका खेडेगावातील एका अनोख्या शाळेचा प्रवास या कादंबरीत सुरेखपणे मांडला गेला आहे. हि एक मुहंमदीयन शाळा आहे. ह्या शाळेतील एक शिक्षक जी १५ वर्षाची मुलगी आहे. आणि याचे मुख्याध्यापक हे या शाळेचे आधार आहेत. जुनी पडायला आलेली इमारत, तुटपुंजे साहित्य असून हि त्यांची शिकवणायची तळमळ कमी झालेली नाही. कामगार वर्गातील मुलांना शाळेत आणण्यासाठी हे शिक्षक खूप प्रयत्न करताना दिसतात.
   शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक वेगळाच अध्याय असतो.
पुरेसे विद्यार्थी नसतील तर शाळा बंद होईल याची भीती शिक्षकांच्या डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी असते.
याच शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांना वाचवायला येतो एक मतिमंद मुलगा. ज्याच्या येण्याने शाळेतील मुलांची संख्या होते १०. आणि मग सुरु होतो  या शाळेतील १० विद्यार्थ्यांच्या  शाळेसोबतचा प्रवास
   या शाळाप्रवासात आहेत कमीत कमी गोष्टीत हि आनंद मानण्याची प्रवृत्ती, कल्पनेचा प्रवास, विचार, नवे शिक्षण, आवडीनिवडी जपणे आणि रोज शाळा शिकण्यासाठी केलेली धडपड विसरून जाण्याची तयारी.
    १ मतिमंद विद्यार्थी आणि ९ धडधाकट विद्यार्थी याना घेऊन ते शालेय वर्ष सुरु होते. शाळा तपासनीस अधिकारी त्यांचा सरकारी खाक्या हे सगळे आपल्याकडील शाळा हि अनुभवत असतात.
   याच विद्यार्थ्यांमध्ये आहे एक हुशार विद्यार्थी लाटांग .   ज्याच्या प्रेरणेने तिथली मुले स्वप्ने बघायला शिकतात. आणि ती पूर्ण व्हावी या साठी प्रयत्न करायाला  बघतात. मेहर हा विद्यार्थी कल्पना आणि संगीत यात प्रवीण असतो. त्यामुळे शाळेला पहिल्यांदा पदक मिळते. या शाळेकडून कुणाला कसलीही अपेक्षा नसते. पण मुलांसाठी मात्र हि शाळा एका नव्या अध्यायाची सुरवात असते. धडधाकट मुले आणि मतिमंद एकत्र शिकू शकतात हे या शाळेच्या माध्यमातून दिसून येते. आणि धडधाकट असो कि मतिमंद लहान मुले एकमेकांना छान सांभाळून घेतात  हे यात दिसते.
   शिक्षण घेताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींवर मात  करण्याची उर्मी त्यातून त्यांना मिळत असते.
शाळेच्या जमिनीत कथिल मिळाल्यावर शाळा पाडून टाकण्याची वेळ आल्यावर हि सगळी मुले आणि शिक्षक एकत्र येऊन विरोध करतात. त्यामुळे त्यांची शाळा वाचते.
   हि शाळा त्या १० विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकते. भविष्यात त्याचे रस्ते जरी वेगळे असले तरी या शाळेचे दुसऱ्याला जमेल तेवढी मदत करा हे संस्कार यातील सगळे विद्यार्थी कायम लक्षात ठेवतात. 

Friday, September 21, 2018

मॅटर्स ऑफ द हार्ट - डॅनियल स्टील (अनुवाद :माधव कर्वे )




  होप डन  हि एक आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर आहे. वेगवेगळे विषय घेऊन फोटोग्राफी करणे हा तिच्या व्यवसायाचा भाग आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्ट्रेट फोटोग्राफी. जगातील नामवंत लोकांचे फोटो प्रोफाईल करणे तिला जास्त आवडते. जगातील नामवंत लोकांशी या निम्मिताने तिच्या ओळखी झाल्या आहेत.
      
इतका यशस्वी प्रवास असून सुद्धा वैयक्तिक आयुष्यात दुःखाची किनार असल्यामुळे होप तशी जगापासून अलिप्त राहते आहे.

याच पार्श्वभूमीवर तिला  फील ओनील या लेखकाचे फोटो काढण्याची   व्यावसायिक ऑफर येते.  या ऑफर मुळे तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरु होतो. फील ओनील बद्दल माहित असून हि ती त्याच्याकडे आकर्षित होते. आणि मग त्या दोघांची प्रेमकहाणी फुलू लागते. त्याच्या काही गोष्टी खटकत असून हि ती त्याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात तिच्या पुढे फील ओनील  च्या आयुष्याची दुसरी काळी बाजू येते. आणि त्यामुळे ती हादरून जाते. तिला प्रश्न पडतो कि नक्की कोणती बाजू खरी आहे फील ओनील ची.

या सगळ्या गोंधळलेल्या मनस्थितीत तिची भेट रॉबर्ट शी होते आणि मग निर्णय घेणे होप साठी सोपे होऊन जाते.

हि कादंबरी माणसाच्या विचित्र मानसिकतेचा निराळाच अनुभव देते. निरागसता,प्रेमळपणा,अचानक स्वभावात होणारे बदल, क्रूरपणा,माणसाचे परिस्थिनुरूप बदल दाखवत राहते.

भयचकित करून टाकणारा एक अनुभव देत हादरवून टाकते.   

           



Monday, August 27, 2018

सेकंड लेडी - आयर्विंग वॅलेस -अनुवाद -रवींद्र गुर्जर


अमेरिका एक बलाढ्य देश. त्याच्या राष्ट्राध्यक्षांना एक वेगळाच मान जगभर मिळत असतो. राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीस फर्स्ट लेडी म्हणून संबोधले जाते. राष्ट्राध्यक्षांच्या जोडीला फर्स्ट लेडी  हि वेगवेगळ्या महत्वाच्या सामाजिक व राजकीय जबाबदाऱ्या   पार पाडत असते. अश्या ह्या फर्स्ट लेडी च्या जागेवर कुणी दुसरी तिच्यासारखी आली तर काय होऊ शकते. याचा हा विलक्षण प्रवास. 

 या प्रवासात फर्स्ट लेडी आणि तिच्यासारखी दिसणारी यांच्या स्वभावातले वेगवेगळे कंगोरे दिसून येतात. 
अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध आणि त्यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची धडपड अचूक पणे दिसते. कुरघोडी करण्याच्या नादात फर्स्ट लेडी ला बदलून त्या जागी आपली हेर नेमण्याचा विचार आणि तो तडीस नेण्यासाठी केलेली धडपड पाहून थक्क व्हायला  होते. 


 

Monday, July 18, 2016

अवंतीची डायरी - डॉ स्वाती गानू

अवंतीची डायरी एक छान मुलीची  दैनंदिनी. हे ऑडिओ पुस्तक ऐकताना असे वाटले की पुन्हा एकदा बालपणात परत गेल्यासारखे वाटले. आई, वडील, बहीण, भावंडे, आजी, आजोबांबरोबर चे छान प्रसंग पुन्हा एकदा आठवून गेले. आई बाबांच्या बरोबर केलेल्या सहली, शाळेतील मैत्रिणी सगळ्या गमतीजमती इतक्या सुंदर वाटत होत्या की असे वाटते अवंती बरोबर आपण ही त्या सगळ्या ठिकाणी  फिरत आहोत. कोकणची गम्मत ऐकली की आंबे खाणे, समुद्रावर जाणे याची आठवण लगेच येते. अवंती मोठे होत असताना तिच्यात होत जाणारे बदल ऐकले की अगदी ८-९ वीत असताना आम्ही कश्या वागत होतो त्याची आठवण येते. त्या वयातले अल्लडपणा आई वडिलांचे सल्ले देणे आणि ते कसे बोर करतात असा आमचा दृष्टीकोन सगळे अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. लहान मुले आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे कसे निरीक्षण करत असतात ते ही बारिकपणे हे त्यातून समजून आले. चांगले वाईट प्रसंग आणि त्यातील त्यांची आणि त्यांच्या आई बाबांची बाजू सगळे ऐकून असे वाटते की हा प्रत्येक पिढीत घडणारा सनातन वाद आहे. मीच बरोबर असे म्हणणारे आई बाबा आणि समजूतदार आई बाबा दोन्ही इथे दिसत राहतात. मुले ही आपल्या वागण्याचे स्वतःच्या कुवतीनुसार विश्लेषण करत राहतात. बऱ्याच वेळेला आई बाबा आणि मुले यांच्यात संवाद कमी पडतो असे दिसून येते. जरूर ऐकण्यासारखी आहे ही गोष्ट

http://www.esahity.com/2321233723672323.html              

Saturday, July 9, 2016

लपवलेल्या काचा -डॉ सलील कुलकर्णी

        सलील कुलकर्णी एक संगीत दिग्दर्शक खूप हळवा मनस्वी वाटणारा. त्याचे लिखाण त्याच्यासारखे मुक्त असलेले . या पुस्तकात तो मांडतो आपल्या आयुष्यातल्या त्या हळव्या जागा ज्या जगायच्या राहून च गेल्या. ते प्रसंग मांडताना अगदी हळुवार होऊन जातो त्याची गाणी जशी हलकेच आपल्याला ताब्यात घेतात तसेच त्याचे लिखाण ही हळुवार पणे मनात सामावून जाते.
       पुस्तक हातात घेताना कल्पनाच नसते की इतके हळुवार काहीतरी हाती लागणार आहे . आणि पुस्तक ठेवताना आठवतात त्या आपल्या  आयुष्यातले हळुवार प्रसंग जे पुन्हा जगावे आणि त्यात काही छान बदल घडवून त्यातून एक छान आठवणींचे पुस्तक तयार व्हावे.हळवे अस्वस्थ करून टाकते हे पुस्तक म्हंटले तर विशेष गोष्टी नसलेले तरी ही आयुष्यातील असंख्य नव्या अनुभवांचे गाठोडे आपल्यापुढे मांडून ठेवणारे प्रसंग यात मांडलेत.          

Friday, July 8, 2016

सोनेरी टोळी -नाथमाधव

          नाथमाधव यांचे सोनेरी टोळी हे पुस्तक वाचकाला गुंतवून ठेवणारे किंवा खिळवून ठेवणारे पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरवातीपासून च प्रत्येक क्षणी एक नवीन धक्का आपल्याला चकित करून टाकतो. यातील प्रत्येक गोष्ट अगदी रंगवून आणि खुलवून सांगितली आहे. रायाक्लब आणि त्याच्या वेगवेगळ्या करामती म्हणजे थक्क करणारा नमुना आहे. इंग्लिश लेखक  शेरलॉक होम्स  जश्या कथा लिहीत असेल तश्या दर्जाची रहस्यमय आणि उत्कंठावर्धक अशी कादंबरी आहे . या कादंबरीच्या निमित्ताने  माणसांचे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. त्याशिवाय ठकसेनचे वेगवेगळे प्रकार त्यांच्या फसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा तपशीलवार पने कळून येतात. माणसातील राग लोभ सुख दुःख आनंद या भावनांचे यात दर्शन होते  माणूस  कसा मोहाला  बळी पडतो हे ही यात दिसून येते.

        आणि हे सगळे वाचताना  आपण अगदी गुंग होऊन जातो. प्रत्येक प्रसंग संपला की पुढे काय होईल याची सतत उत्कंठा लागून राहते. कथेतील वाचकांचा रस टिकवून ठेवणे हेच या कादंबरीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल       

शोधयात्रा- विदुर महाजन


हे पुस्तक मी वाचायला घेतले ते खास शमा पांडे यांनी सांगितल्यामुळेच. पुस्तक वाचायला सुरवात केल्यावर त्यातले साधेपणा इतका भावला की पुस्तक एक बैठकीत वाचून कधी संपले हे कळलेच नाही.
  शोधयात्रा -श्री विदुर महाजन यांचे पुस्तक, स्वतः एक सतारवादक असेलेले  ज्यांनी उद्योजक होण्याचे धाडस दाखवले आणि या उद्योजक होण्यातल्या छोट्या मोठ्या बाबी समजून घेत त्यांनी व्यवस्थेतील माणसांशी सुद्धा दोन हात करून दाखवले. लाचखोरी ही भारतात उद्योगांच्या पुढचा सगळ्यात मोठा अडसर आणि त्याच गोष्टीच बिमोड करण्याचे धैर्य त्यांनी व्यवस्थेतील चांगल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने करून दाखवले.
    शोधयात्रा हा प्रवास आहे विदुर महाजन यांच्या उद्योग चालवणे त्यातील खाचखळग्यांचा विचार करून त्यात योग्य मार्ग शोधून काढणे, त्याच बरोबर माणसांशी वागताना येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांचे प्रतीक यांचा आहे. या प्रवासात त्यांना अनेक क्षेत्रातील चांगली वाईट माणसे भेटली त्याचे त्याने छान वर्णन यात केले आहे.  आणि उद्योग सुरू करताना किंवा सुरू झाल्यावर सुद्धा त्यांना अखंड साथ देणारी सतार कायम त्यांच्या आयुष्याचा  भाग कशी  बनून राहिली याचे सुरेल वर्णन . त्यांच्या घरच्या मंडळींनी ही त्यांना उत्तम साथ दिली
      एक साध्या सरळ कलात्मक माणसाचा हा सुंदर ओघवत्या शैलीचा हा प्रवासानुभव           

Monday, August 17, 2015

रुल्स ऑफ डीसेप्शन - ख्रिसटोफर रीच - अनुवाद दीपक कुलकर्णी

रुल्स ऑफ डीसेप्शन   - ख्रिसटोफर रीच - अनुवाद दीपक कुलकर्णी

हि एका महिला गुप्तहेराची कथा आहे. डॉक्टर एम्मा आणि डॉक्टर जोनाथन रान्सम यांची. डॉक्टर एम्मा हि डॉक्टर आणि गुप्तहेर असे दुहेरी आयुष्य जगते आहे आणि ते हि जोनाथन म्हणजे तिच्या नवऱ्या पासून लपवून. इम्माचा मृत्यू  गिर्यारोहण करताना हिमवादळात होतो. आणि  जोनाथन च्या हाती एक पाकीट पडते आणि मग सुरु होतो एक थरारक पाठलाग जोनाथन आणि गुप्तहेर संघटना यांच्यात. त्याच जोडीला जोनाथन चा   शोध सुरु होतो एम्मा च्या खऱ्या अस्तित्वाबद्दल. गुप्तहेर संघटना त्यांचे कार्य, आणि त्यांना सामना कराव्या लागणाऱ्या संकटाचे वेगळेच जग आपल्यापुढे या कथेतून उभे राहते