Wednesday, February 19, 2020

डेथ वॉज नॉट पेनफुल - श्री. धीरेंद्र सिंग जफा अनुवाद - वर्षा गजेंद्रगडकर अभिजित प्रकाशन


१९७१ च्या युद्धात सहभागी झालेले श्री.  धीरेंद्र सिंग जफा यांनी अनुभवलेले क्षण  या पुस्तकात नमूद केले आहेत. भारतीय एअर फोर्स मध्ये फायटर पायलट  म्हणुन  श्री.  धीरेंद्र सिंग जफा  यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १९७१ च्या युद्धात त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली.
  भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या या युद्धात त्यांचे विमान पाकिस्तान मध्ये कोसळल्यामुळे त्यांना युद्ध कैदी म्हणून पाकिस्तानच्या तुरुंगात राहावे लागले. पाकिस्तान तुरुंगात मिळणारी वागणूक,तिथले सैनिक, त्यांचा आवेश, युद्धकैद्यांना मिळणारी वागणूक हे सगळे वाचताना अंगावर रोमांच उभे राहते.
 युद्ध त्याचे विविध पैलू,त्यात खेळले जाणारे डावपेच, सैनिकांची यातील भूमिका हे वाचताना मन अस्वस्थ होते. आपले सहकारी कुठे असतील याची वाटणारी चिंता आणि ते भेटल्यानंतर होणार आनंद अवर्णनीय आहे.
युद्धात सैनिकांना काही ठरवण्याची मुभा नसते. फक्त ऑर्डर पाळणे हे त्याच्या हातात असते.

   युद्धकैदी म्हणून वावरताना त्यांना घरच्यांची येणारी आठवण, आणि युद्धामुळे उध्वस्त झालेल्या एका पाकिस्तानी तरुणीने दिलेली अचानक भेट यामुळे येणारी अस्वस्थता सुन्न करून टाकणारी आहे.

आम्ही जिंकणारच हा पाकिस्तानी  सैनिकांचा अविर्भाव आणि हरल्यानंतर येणारी शरमेची भावना लपून राहत नाही. घरी जाण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे चक्क पाकिस्तानी तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारे तिघे सहकारी आणि त्यांचा तो प्रवास चित्त थरारून टाकतो.

  युद्धात सहभागी होणारे जफा यांचे सहकारी, त्यांचे रोमहर्षक स्वभाव वाचताना एक निराळीच अनुभूती येते. पहिल्या युद्धात होणाऱ्या सहकाऱ्याला  सांभाळून घेताना करावी लागलेली मानसिक कसरत जफा यांच्या समजूतदार स्वभावाचे दर्शन घडवतात.

         

Tuesday, January 14, 2020

द सेव्हन्थ सीक्रेट - आयर्विंग वॅलेस - अनुवाद - विजय देवधर


आधुनिक इतिहास  विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ हॅरिसन ऐशक्राफ्ट यांना एकाच गोष्टीने झपाटून टाकले होते आणि ते म्हणजे  जर्मन हुकूमशहा एडॉल्फ हिटलर याचे  चरित्र "हेर हिटलर ".
 हेर हिटलर चे काम करत असताना त्यांना एक अनपेक्षित पत्र येते आणि त्यांच्या आयुष्याला एक निराळेच वळण लागते. त्यांना मिळालेली माहिती तपासून पाहण्यासाठी ते जर्मनीत दाखल होतात.
  आणि त्यांचा अपघात होतो. त्यांची मुलगी एमिली ऐशक्राफ्ट हे पुस्तकाचे काम करण्यासाठी आणि त्या संदर्भात शोध घेण्यासाठी जर्मनी  ला जायचे ठरवते. तिला हि एक पत्र येते. त्यात तिच्या वडिलांचा अपघात झाला नसून खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते.
   असे असून हि ती जर्मनीला जाण्याचे ठरवते. तिच्या या प्रवासात तिला रेक्स फॉस्टर हा आर्किटेक्ट,निकोलस किरवोव हा कलासंग्रहाचा व्यवस्थापक, पीटर निट्झ हा पत्रकार,तोवाह हि मोसाद ची एजन्ट हे  विविध टप्प्यावर भेटतात. आणि मग सुरु होतो एक थरारक प्रवास ज्यात त्यांची गाठ असते "नाझी सर्वश्रेष्ठ आहेत असे वाटणाऱ्या लोकांशी". त्यांना हुलकावणी देत रेक्स फॉस्टर आणि एमिली  पोचतात एका गूढ ठिकाणी जिथे त्यांची गाठ पडते एका अश्या स्त्री शी जी काळाच्या पडद्यावर केव्हाच नाहीशी झाली आहे. तिच्या  भविष्यातील विचित्र  योजना ऐकून त्यांचा थरकाप उडतो.  आणि मग सुरु होते त्यांची तिथून सुटण्याची धडपड

अतिशय चित्तथरारक आणि मनाची पकड घेणारी कादंबरी.  वेगवेगळे व्यावसायिक आणि त्यांची एकमेकांत गुंतलेली आयुष्ये एक वेगळीच खुमारी आणतात.  हिटलर आणि इवा ब्राऊन यांचे काय झाले हे गूढ उकलण्याचा एक वेगळाच प्रयत्न. 

शासकीय संकेतस्थळ

माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक माहिती संबंधी संकेतस्थळ