Sunday, January 1, 2017

गम्मत ताऱ्यांची

ग्रह आणि तारे बघण्याची गम्मत एकदा तरी नक्की अनुभवायला हवी. निरभ्र आकाश,मोकळे मैदान आणि दिलखुलास मित्र  मैत्रिणी बरोबर असतील तर आकाशदर्शन हा एक अविस्मरणिय अनुभव होतो.
 
  मामणोली गावात हा आकाशदर्शनचा कार्यक्रम आयोजित केला होता. गुलाबी थंडी,निरभ्र  आकाश, गरम कपड्यात गुरफटलेले आम्ही आकाशप्रेमी, आमचे शिक्षक आणि खगोल अभ्यासक यांच्या  मुळे हा कार्यक्रम अगदी रंगून गेला होता.या सगळ्यांबरोबर फर्मास चहा आणि गरम गरम जेवण  अगदी सुवर्णकांचन योगच म्हणायचा.   
    रात्रभर खगोल अभ्यासक ग्रह तारे नक्षत्र आणि दीर्घिका यांची माहिती देत होते. त्याच्या जोडीला नुसत्या डोळ्यांनी नक्षत्र कशी पाहावी हे सुद्धा सांगत होते. ग्रह,तारे नक्षत्र शिकल्यानंतर असे स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव अप्रतिम होता.आमचे शिक्षक हि नक्षत्र आणि दीर्घिका यांच्याशी जोडलेल्या वेगवेगळ्या
कथा आम्हाला सांगत होते. त्या कथांमुळे तर कार्यक्रमात अजून रंगत येत होती.खगोल अभ्यासक आणि आमचे शिक्षक आमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत होते. त्यामुळे आमचे हि छान समाधान होत होते.
    टेलिस्कोप मधून ग्रह बघणे हा एक मस्त अनुभव होता. नाजुकशी चंद्रकोर आणि शुक्राची चांदणी बघताना तर सगळ्यांना छान गाणी सुद्धा सुचत होती. लालसर मंगळ बघताना इतका छान वाटत होता कि उगाच वाटले तापट म्हणण्यापेक्षा त्याला लाजरा नाव छान  वाटेल. पूर्वी आकाशदर्शनाचे कार्यक्रम कसे झाले होते याची हि चर्चा आम्हाला ऐकायला मिळाली
   हे सगळे बघताना टेक्नॉलॉजिला विसरून कसे चालेल. तेवढ्या वेळात दोन अँप चा हि नवीन शोध लागला आम्हाला. स्काय व्ह्यू आणि इंडियन स्काय मॅप. हि अँप डाउनलोड करून घेतल्यावर तर आकाश पाहण्याची अजून मजा आली. या ऍप मुळे नुसता मोबाइल फिरवला तरी आकाशात कोणते नक्षत्र आहे त्याच्या आकृती यावर दिसु शकत होत्या.
  या कार्यक्रमामुळे आयुष्यातील एक अप्रतिम अनुभवाचे आम्ही साक्षीदार ठरलो.