Thursday, November 9, 2017

यामिनी


आज ऑफिस मध्ये बसलो होतो. काही काम नव्हते हाताशी. मग काय विचारांची गर्दी झाली होती मनात.  टेबलवर ठेवलेल्या नोटपॅडवर मनातले कधी लिहायला लागलो कळलेच नाही.
  आज तिची आठवण झाली आणि तिला पत्र लिहावे असे वाटू लागले.

प्रिय यामिनी

तू माझ्या आयुष्यात येऊन २ वर्षे झाली. तशी वर्गात तू नेहमीच दिसत असायचीस. पण तेव्हा आपण फारसे बोलत नव्हतो. पहिले वर्ष असेच गेले आणि दुसऱ्या वर्षात आपण एकमेकांशी बोलू लागलो. फारशी न बोलणारी तू अचानक फार महत्वाची होऊन बसलीस माझ्यासाठी. आपण रोज बोलू लागलो एकमेकांशी आणि एक दिवस अचानक तू विचारलेस का बोलतो रोज आपण. पण याचे उत्तर द्यावे असे मला वाटलेच नाही. पण त्यानंतर मी हळू हळू बोलणे कमी केले. तू नेहमी विचारयचीस मला, काय वाटते  माझ्याबद्दल? आणि मी सतत सांगायचे टाळत  राहिलो. मी बघत होतो तुझे माझ्यात गुंतत जाणे, पण मी बांधून घेतलो होते स्वतःला. कुठेच गुंतायचं नाही असा विचार करून मी होईल तेवढे तुला तोडून टाकायचा प्रयत्न करत राहिलो. पण हळू हळू तू माझ्या मनात कशी उतरत गेलीस कळलेच नाही मला. पण मी हे सतत नाकारत राहिलो. माझ्या आयुष्यात खास जागा मिळवण्यासाठी तू धडपडत राहिलीस आणि मी नेहमी यावर व्यक्त होणे टाळत  राहिलो  आणि अचानक तू हि पाठ फिरवलीस माझ्याकडे मी किती हि व्हाट्स अप वर चांगले मेसेज टाकले तरी तू काही व्यक्त होत नव्हतीस. अभ्यास सोडून काही बोलायचे तू सोडून दिलेस. मला भेटायचे सुद्धा तू टाळत राहिलीस.

आज मला माझीच वाक्ये आठवत आहेत. फार गुंता झाला कि कात्री लावून कापून टाकावा. म्हणजे त्रास होत नाही,.

मोबाईलची बेल वाजली आणि माझ्या विचारातून भानावर आलो. ओहो यामिनीचा फोन क्या बात है. आज भेटायला आले तर चालेल का? सर्टिफिकेट घ्यायचे होते. तिने विचारले आणि मी पटकन हो म्हंटले.  थोड्याच वेळात ती आली. माझ्यासाठी माझी आवडती चॉकलेट्स आणली होती तिने. ती बघून मन खुश झाले होते माझे.
तिने हलकेच विचारले कि मी काही मागू शकते का? आणि मला आठवण झाली तिच्या मागणीची
काय मागेल आता हि असा मी विचार करू लागलो.? आणि तिने हलकेच सांगितले पाच मिनिट डोळे बंद करून बसाल माझ्यासाठी. थोडेसे विचित्र होते हे पण मी मान्य केले.
   ५ मिनिट झाले मी डोळे उघडले, ती हसली आणि निघून गेली. मी विचारात पडलो, मला वाटले  काहीही मागू शकली असती ती पण मला मनात नि डोळ्यात साठवून गेली ती . अगदी माझा हात हातात घेऊन बघावासा वाटत असून सुद्धा असे काहीच न करता, माझी मर्यादा मोडणार नाही याची काळजी घेणारी
    तिच्याबद्दल मला काय वाटतेय हे पत्रात लिहणारा मी तिला प्रत्यक्ष काही सांगायचं प्रयत्न सुद्धा का केला नाही कोण जाणे या प्रश्नाचे उत्तर कायम अनुत्तरित च राहणार असे दिसतेय 
                           

डायरी

बस स्टॉप वर उभे राहून वाट बघणे फारच कंटाळवाणे असते. त्यात केवढे ऊन होते,अगदी अंग भाजून निघत होते. इतक्यात ती आली. साधीशीच दिसणारी पण तिच्यात काहीतरी खास असावे असे मला वाटून गेले. उन्हाला चुकवत बस स्टॉप च्या आडोश्याला येऊन ती बेंचवर बसून राहिली.हातातली पिशवी बेंच वर ठेवून मोबईल वर वेगाने टाईप करत होती. चेहरा अगदी मस्त खुशीत होता. माझ्याही नकळत मी तिच्या कडे बघत होतो. एवढ्यात भर्रकन एक बस आली आणि ती पटकन उठून धावत बस मध्ये शिरली. मी माझ्या बस ची वाट बघून अगदी कंटाळून गेलो होतो.
  आणि अचानक माझी बेंच कडे नजर गेली आणि मी चमकलो. ती पिशवी तिथेच विसरून गेली होती. काय करावे बघावे का पिशवीत काय आहे. मनाची द्विधा मनस्थिती झाली होती. पण तरीही कुतूहल काही संपत नव्हते. मग हलकेच मी बेंच कडे मोर्चा वळवला आणि कोणी पाहत नाही ना असे आजूबाजूला बघत पिशवी ताब्यात घेतली. पिशवीत डोकावून पहिले  तर त्यात एक डायरी निघाली. काय करावे बघावे का कुणाची आहे. मनात विचाराचे काहूर माजले होते. शेवटी मी डायरी उघडली आणि पहिल्या पानावरचे तिचे नाव वाचले. अनामिका

नावासारखीच होती ती गूढ. डायरीत  तिचा पत्ता आणि फोन नंबर होता. मी फोन करून पहिला तर तो लागत नव्हता.  शेवटी मी ती डायरी तिला परत करायचा विचार केला. माझ्या घराच्या जवळच होते तिचे घर. मी असा विचार करायला आणि माझी बस यायला एकाच गाठ पडली. बस मध्ये बसलो तिकीट काढले आणि खिडकीतून बाहेर बघत बसलो. तिची डायरी काही मला स्वस्थ बसू देत नव्हती. कुणाची डायरी वाचू नये हे सगळे माहित असताना सुद्धा मी मात्र हा आगाऊपणा करायचा ठरवला.

    माझा स्टॉप येईपर्येंत किमान २ तास लागणार होते. तोपर्येंत ती डायरी चाळावी असे मला वाटू लागले. मी डायरी उघडून वाचायला सुरवात केली. एक एक पान वाचताना एखाद्या कथेसारखे माझ्यासमोरतिच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग येऊ लागले. मनातील सगळे तिने त्या डायरीत जपून ठेवले होते. मान अपमान,त्रास,आनंद. सगळे च माझ्यापुढे उलगडू लागले होते. डायरी च्या शेवटच्या पानावर तिच्या हळव्या पण बेभान करणाऱ्या कविता मी वाचल्या आणि डोळ्यात पाणी  आले. त्या क्षणी अपराधी सुद्धा वाटले.तिला न सांगता तिच्या भाव विश्वात डोकावण्याचा मी केलेला प्रयत्न मला अस्वस्थ करून गेला. माझा स्टॉप आला आणि मी उतरलो तिच्या घराच्या दिशेने पावले टाकताना खूप जड झाली होती माझी पावले. गेटवर विचारून मी तिच्या इमारतीकडे चालू लागलो. विचार करत होतो काय सांगायचे कशी सापडली डायरी. बेल वाजवली दार उघडले. बहुतेक अनामिकाची आई होती. तिला सांगितले डायरी बद्दल. दारातून च परत जायचा विचार करत होतो मी पण तिच्या आईने घरात बोलावले. चहा आणि खायला हि दिले. त्यांच्या आदरातिथ्याने मी भारावून गेलो. तेवढ्यात अनामिका  आली. घामाघूम  आणि स्वतःवरच नाराज झालेली. मला बघून थोडीशी बिचकली  ती. कोण हि अनोळखी व्यक्ती. एवढ्यात तिला तिची डायरी दिसली आणि तिचा चेहरा इतका खुलला कि माझ्या येण्याचे सार्थक झाले असे वाटले. तिची आई अनामिकेच्या कवितांचे तारिफ करत होती आणि ती खूप अवघडून गेली होती. मी हि मग कविता ऐकवण्याचा आग्रह केला. आणि मग तिच्या सुंदर आवाजातील कविता ऐकून दिवस सार्थकी लागल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर मस्त झळकू लागला.   

तिच्याकडून निघताना माझ्या मनात एकाच प्रश्न होता कि इतका त्रास आयुष्यात असून सुद्धा ती इतक्या छान  कविता कशी करू शकते? पण काहीही न विचारता मी निघालो आणि तिने निश्वास सोडल्याचा मला भास झाला                                                        

Tuesday, June 27, 2017

भेट


आजचा दिवस प्रीतीसाठी खूप खास होता. आज तिची भेट तिच्या आवडत्या लेखकाशी होणार होती. भेट कशी होईल, काय बोलतील याच्याबद्दल तिच्या मनात  उत्सुकता  आणि हुरहूर दोन्ही होती. काही दिवसापुर्वी त्यांची सोशल मीडिया वरून ओळख झाली होती.  लेखक म्हणून समाजात ओळख असलेले ते उत्तम चित्रकार आणि कवी सुद्धा आहेत हे तिला त्यांच्या संवादातून कळले आणि मग त्यांच्याशी छान  जोडले गेल्यासारखे तिला वाटायला लागले.
  खूप गप्पा झाल्यावर मग त्यांना एकमेकांचे मित्र मैत्रीण असल्यासारखे वाटू लागले. आणि काहीच दिवसात त्यांनी तिला भेटीला येण्याचे आमंत्रण दिले.  त्यांनी आपल्याला आमंत्रण दिले याचे तिला आश्चर्य वाटत राहिले
    ती त्यांच्या घरी गेली तिचे  यथोचित स्वागत झाले आणि मग सुरु झाल्या मनमोकळ्या गप्पा. त्या गप्पांना विषयांचे बंधन नव्हते. वेगवेगळ्या विषयांचे त्यांचे ज्ञान पाहून प्रीती चकित झाली होती. आणि मग गप्पांच्या शेवटी त्यांनी तिचे चित्र काढण्याची परवानगी मागितली आणि तिला काही सुचेना कि काय उत्तर द्यावे. एकाच दिवशी एवढे सुखद धक्के मिळाल्यामुळे ती खूप आनंदी आणि आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर अवघ्या काही तासात तिचे एक सुंदर चित्र तिला पाहायला मिळाले. आणि त्याहीपेक्षा त्यांनी ते चित्र त्यांची  स्वाक्षरी करून तिला भेट दिले याचा तिला खूप आनंद झाला .
    प्रीती च्या आयुष्यातील हा एक अप्रतिम दिवस होता. लेखकाशी भेट, मनमोकळ्या गप्पा आणि मग तिच्या चित्राची तिला मिळालेली भेट. अगदी सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस. तिच्या वाचनाचे आणि कवितांचे कौतुक त्यांनी केले त्यामुळे आज खुश होती ती.
   आता तिला घरी जाण्याचे वेध लागले होते. कधी एकदा हि गोष्ट मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सांगते याची ती वाट बघत होती. आणि सोशल मीडियावर हि बातमी शेअर केल्यावर फोन आणि  मेसेजेस चा पाऊस पडेल याची तिला आता खात्री वाटू लागली                  

Wednesday, June 7, 2017

मनमौजी



रात्री ९ ३० ची वेळ होती. ती  ट्रेन मधून प्रवास करत होती. आई च्या घरी जाऊन आल्यामुळे आनंदात होती. आज छान गप्पा मारायला वेळ हि मिळाला होता. रात्रीची वेळ होती त्यामुळे तशी बायकांच्या डब्यात शांतता होती. बऱ्याच जणी मोबाइल मध्ये गुंतून गेल्या होत्या. आणि बाकीच्या गप्पा मारण्यात. एवढ्यात शेजारच्या डब्यातून गाण्याचे सूर ऐकू आले. पहिल्यांदा वाटले कोण गात  असेल बरे, दिसत नव्हते कोण गातेय. पण एका वयस्कर पुरुषाचा आवाज होता  हे कळत होते. आधी वाटले एखादा भिकारी वगैरे असेल कारण ट्रेन मध्ये बऱ्याच वेळा भिकारी गाणी म्हणून भीक मागत असतात. पण हा आवाज काही वेगळाच वाटत होता. आणि तेवढ्यात तो दिसला आणि खूप आश्चर्य वाटले. उंचापुरा, वयाने म्हातारा, हातात एक जुने पुस्तक घेऊन वेगवेगळी गाणी गाणारा,स्वतःच्या मस्तीत रमलेला,त्याच्या आजूबाजूची काही माणसे दाद देत होती काही नाक मुरडत होती. काही वैतागत सुद्धा होती. पण त्याला मात्र त्याची काही सुद्धा फिकीर  वाटत नव्हती.              

तो मस्त त्याच्या धुंदीत गात होता.   तिच्याही नकळत त्याच्या गाण्याचा  ती छान आनंद घेत होती. तिला हि मग काही नवी जुनी गाणी आठवली. आणि स्वतःच्या नकळत ती गाणी ती गुणगुणू लागली.  इतरांच्या प्रतिक्रियेवर अगदी हसू आले तिला. तिच्या मनात बरेच विचार आले जसे कि मोकळेपणाने जगणे आपण तसे सोडून च देतो. सतत लोकांच्या अपेक्षांचे ओझे असते आपल्या मनावर. आणि मग एखादा असे मनासारखे वागू लागला कि मग आपण म्हणतो याला काही रीतच नाही कुठे काय वागायचे त्याची.
   पण  तिला मात्र तो कुठे तरी मनातून भावला. मनासारखा वागणारा तो एक मनमौजी वाटला.                         

Sunday, January 1, 2017

गम्मत ताऱ्यांची

ग्रह आणि तारे बघण्याची गम्मत एकदा तरी नक्की अनुभवायला हवी. निरभ्र आकाश,मोकळे मैदान आणि दिलखुलास मित्र  मैत्रिणी बरोबर असतील तर आकाशदर्शन हा एक अविस्मरणिय अनुभव होतो.
 
  मामणोली गावात हा आकाशदर्शनचा कार्यक्रम आयोजित केला होता. गुलाबी थंडी,निरभ्र  आकाश, गरम कपड्यात गुरफटलेले आम्ही आकाशप्रेमी, आमचे शिक्षक आणि खगोल अभ्यासक यांच्या  मुळे हा कार्यक्रम अगदी रंगून गेला होता.या सगळ्यांबरोबर फर्मास चहा आणि गरम गरम जेवण  अगदी सुवर्णकांचन योगच म्हणायचा.   
    रात्रभर खगोल अभ्यासक ग्रह तारे नक्षत्र आणि दीर्घिका यांची माहिती देत होते. त्याच्या जोडीला नुसत्या डोळ्यांनी नक्षत्र कशी पाहावी हे सुद्धा सांगत होते. ग्रह,तारे नक्षत्र शिकल्यानंतर असे स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव अप्रतिम होता.आमचे शिक्षक हि नक्षत्र आणि दीर्घिका यांच्याशी जोडलेल्या वेगवेगळ्या
कथा आम्हाला सांगत होते. त्या कथांमुळे तर कार्यक्रमात अजून रंगत येत होती.खगोल अभ्यासक आणि आमचे शिक्षक आमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत होते. त्यामुळे आमचे हि छान समाधान होत होते.
    टेलिस्कोप मधून ग्रह बघणे हा एक मस्त अनुभव होता. नाजुकशी चंद्रकोर आणि शुक्राची चांदणी बघताना तर सगळ्यांना छान गाणी सुद्धा सुचत होती. लालसर मंगळ बघताना इतका छान वाटत होता कि उगाच वाटले तापट म्हणण्यापेक्षा त्याला लाजरा नाव छान  वाटेल. पूर्वी आकाशदर्शनाचे कार्यक्रम कसे झाले होते याची हि चर्चा आम्हाला ऐकायला मिळाली
   हे सगळे बघताना टेक्नॉलॉजिला विसरून कसे चालेल. तेवढ्या वेळात दोन अँप चा हि नवीन शोध लागला आम्हाला. स्काय व्ह्यू आणि इंडियन स्काय मॅप. हि अँप डाउनलोड करून घेतल्यावर तर आकाश पाहण्याची अजून मजा आली. या ऍप मुळे नुसता मोबाइल फिरवला तरी आकाशात कोणते नक्षत्र आहे त्याच्या आकृती यावर दिसु शकत होत्या.
  या कार्यक्रमामुळे आयुष्यातील एक अप्रतिम अनुभवाचे आम्ही साक्षीदार ठरलो.