Thursday, November 9, 2017

डायरी

बस स्टॉप वर उभे राहून वाट बघणे फारच कंटाळवाणे असते. त्यात केवढे ऊन होते,अगदी अंग भाजून निघत होते. इतक्यात ती आली. साधीशीच दिसणारी पण तिच्यात काहीतरी खास असावे असे मला वाटून गेले. उन्हाला चुकवत बस स्टॉप च्या आडोश्याला येऊन ती बेंचवर बसून राहिली.हातातली पिशवी बेंच वर ठेवून मोबईल वर वेगाने टाईप करत होती. चेहरा अगदी मस्त खुशीत होता. माझ्याही नकळत मी तिच्या कडे बघत होतो. एवढ्यात भर्रकन एक बस आली आणि ती पटकन उठून धावत बस मध्ये शिरली. मी माझ्या बस ची वाट बघून अगदी कंटाळून गेलो होतो.
  आणि अचानक माझी बेंच कडे नजर गेली आणि मी चमकलो. ती पिशवी तिथेच विसरून गेली होती. काय करावे बघावे का पिशवीत काय आहे. मनाची द्विधा मनस्थिती झाली होती. पण तरीही कुतूहल काही संपत नव्हते. मग हलकेच मी बेंच कडे मोर्चा वळवला आणि कोणी पाहत नाही ना असे आजूबाजूला बघत पिशवी ताब्यात घेतली. पिशवीत डोकावून पहिले  तर त्यात एक डायरी निघाली. काय करावे बघावे का कुणाची आहे. मनात विचाराचे काहूर माजले होते. शेवटी मी डायरी उघडली आणि पहिल्या पानावरचे तिचे नाव वाचले. अनामिका

नावासारखीच होती ती गूढ. डायरीत  तिचा पत्ता आणि फोन नंबर होता. मी फोन करून पहिला तर तो लागत नव्हता.  शेवटी मी ती डायरी तिला परत करायचा विचार केला. माझ्या घराच्या जवळच होते तिचे घर. मी असा विचार करायला आणि माझी बस यायला एकाच गाठ पडली. बस मध्ये बसलो तिकीट काढले आणि खिडकीतून बाहेर बघत बसलो. तिची डायरी काही मला स्वस्थ बसू देत नव्हती. कुणाची डायरी वाचू नये हे सगळे माहित असताना सुद्धा मी मात्र हा आगाऊपणा करायचा ठरवला.

    माझा स्टॉप येईपर्येंत किमान २ तास लागणार होते. तोपर्येंत ती डायरी चाळावी असे मला वाटू लागले. मी डायरी उघडून वाचायला सुरवात केली. एक एक पान वाचताना एखाद्या कथेसारखे माझ्यासमोरतिच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग येऊ लागले. मनातील सगळे तिने त्या डायरीत जपून ठेवले होते. मान अपमान,त्रास,आनंद. सगळे च माझ्यापुढे उलगडू लागले होते. डायरी च्या शेवटच्या पानावर तिच्या हळव्या पण बेभान करणाऱ्या कविता मी वाचल्या आणि डोळ्यात पाणी  आले. त्या क्षणी अपराधी सुद्धा वाटले.तिला न सांगता तिच्या भाव विश्वात डोकावण्याचा मी केलेला प्रयत्न मला अस्वस्थ करून गेला. माझा स्टॉप आला आणि मी उतरलो तिच्या घराच्या दिशेने पावले टाकताना खूप जड झाली होती माझी पावले. गेटवर विचारून मी तिच्या इमारतीकडे चालू लागलो. विचार करत होतो काय सांगायचे कशी सापडली डायरी. बेल वाजवली दार उघडले. बहुतेक अनामिकाची आई होती. तिला सांगितले डायरी बद्दल. दारातून च परत जायचा विचार करत होतो मी पण तिच्या आईने घरात बोलावले. चहा आणि खायला हि दिले. त्यांच्या आदरातिथ्याने मी भारावून गेलो. तेवढ्यात अनामिका  आली. घामाघूम  आणि स्वतःवरच नाराज झालेली. मला बघून थोडीशी बिचकली  ती. कोण हि अनोळखी व्यक्ती. एवढ्यात तिला तिची डायरी दिसली आणि तिचा चेहरा इतका खुलला कि माझ्या येण्याचे सार्थक झाले असे वाटले. तिची आई अनामिकेच्या कवितांचे तारिफ करत होती आणि ती खूप अवघडून गेली होती. मी हि मग कविता ऐकवण्याचा आग्रह केला. आणि मग तिच्या सुंदर आवाजातील कविता ऐकून दिवस सार्थकी लागल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर मस्त झळकू लागला.   

तिच्याकडून निघताना माझ्या मनात एकाच प्रश्न होता कि इतका त्रास आयुष्यात असून सुद्धा ती इतक्या छान  कविता कशी करू शकते? पण काहीही न विचारता मी निघालो आणि तिने निश्वास सोडल्याचा मला भास झाला                                                        

5 comments:

Unknown said...

खूप सुंदर लिहलेस

मोकळे मन said...

मन चांगले असले की चांगलेच लिहिले जाते . मग स्वतःला कितीही त्रास होवो . सुंदर

Unknown said...

छान लिहीले आहे

Vrushalisaid said...

Best.
Positive thinking.
I like it.

Milind said...

छान कथा