Tuesday, June 27, 2017

भेट


आजचा दिवस प्रीतीसाठी खूप खास होता. आज तिची भेट तिच्या आवडत्या लेखकाशी होणार होती. भेट कशी होईल, काय बोलतील याच्याबद्दल तिच्या मनात  उत्सुकता  आणि हुरहूर दोन्ही होती. काही दिवसापुर्वी त्यांची सोशल मीडिया वरून ओळख झाली होती.  लेखक म्हणून समाजात ओळख असलेले ते उत्तम चित्रकार आणि कवी सुद्धा आहेत हे तिला त्यांच्या संवादातून कळले आणि मग त्यांच्याशी छान  जोडले गेल्यासारखे तिला वाटायला लागले.
  खूप गप्पा झाल्यावर मग त्यांना एकमेकांचे मित्र मैत्रीण असल्यासारखे वाटू लागले. आणि काहीच दिवसात त्यांनी तिला भेटीला येण्याचे आमंत्रण दिले.  त्यांनी आपल्याला आमंत्रण दिले याचे तिला आश्चर्य वाटत राहिले
    ती त्यांच्या घरी गेली तिचे  यथोचित स्वागत झाले आणि मग सुरु झाल्या मनमोकळ्या गप्पा. त्या गप्पांना विषयांचे बंधन नव्हते. वेगवेगळ्या विषयांचे त्यांचे ज्ञान पाहून प्रीती चकित झाली होती. आणि मग गप्पांच्या शेवटी त्यांनी तिचे चित्र काढण्याची परवानगी मागितली आणि तिला काही सुचेना कि काय उत्तर द्यावे. एकाच दिवशी एवढे सुखद धक्के मिळाल्यामुळे ती खूप आनंदी आणि आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर अवघ्या काही तासात तिचे एक सुंदर चित्र तिला पाहायला मिळाले. आणि त्याहीपेक्षा त्यांनी ते चित्र त्यांची  स्वाक्षरी करून तिला भेट दिले याचा तिला खूप आनंद झाला .
    प्रीती च्या आयुष्यातील हा एक अप्रतिम दिवस होता. लेखकाशी भेट, मनमोकळ्या गप्पा आणि मग तिच्या चित्राची तिला मिळालेली भेट. अगदी सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस. तिच्या वाचनाचे आणि कवितांचे कौतुक त्यांनी केले त्यामुळे आज खुश होती ती.
   आता तिला घरी जाण्याचे वेध लागले होते. कधी एकदा हि गोष्ट मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सांगते याची ती वाट बघत होती. आणि सोशल मीडियावर हि बातमी शेअर केल्यावर फोन आणि  मेसेजेस चा पाऊस पडेल याची तिला आता खात्री वाटू लागली                  

2 comments:

तिसरी बाजू said...

प्रीती आणि लेखकाची मैत्री पुढे कुठली वळणे घेते हे वाचणे औत्सुक्याचे राहिल.....ती मळवाटेने जाते की नव्या वाटा शोधील?
संजय पवार

Unknown said...

very nicely written.