Wednesday, February 19, 2020

डेथ वॉज नॉट पेनफुल - श्री. धीरेंद्र सिंग जफा अनुवाद - वर्षा गजेंद्रगडकर अभिजित प्रकाशन


१९७१ च्या युद्धात सहभागी झालेले श्री.  धीरेंद्र सिंग जफा यांनी अनुभवलेले क्षण  या पुस्तकात नमूद केले आहेत. भारतीय एअर फोर्स मध्ये फायटर पायलट  म्हणुन  श्री.  धीरेंद्र सिंग जफा  यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १९७१ च्या युद्धात त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली.
  भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या या युद्धात त्यांचे विमान पाकिस्तान मध्ये कोसळल्यामुळे त्यांना युद्ध कैदी म्हणून पाकिस्तानच्या तुरुंगात राहावे लागले. पाकिस्तान तुरुंगात मिळणारी वागणूक,तिथले सैनिक, त्यांचा आवेश, युद्धकैद्यांना मिळणारी वागणूक हे सगळे वाचताना अंगावर रोमांच उभे राहते.
 युद्ध त्याचे विविध पैलू,त्यात खेळले जाणारे डावपेच, सैनिकांची यातील भूमिका हे वाचताना मन अस्वस्थ होते. आपले सहकारी कुठे असतील याची वाटणारी चिंता आणि ते भेटल्यानंतर होणार आनंद अवर्णनीय आहे.
युद्धात सैनिकांना काही ठरवण्याची मुभा नसते. फक्त ऑर्डर पाळणे हे त्याच्या हातात असते.

   युद्धकैदी म्हणून वावरताना त्यांना घरच्यांची येणारी आठवण, आणि युद्धामुळे उध्वस्त झालेल्या एका पाकिस्तानी तरुणीने दिलेली अचानक भेट यामुळे येणारी अस्वस्थता सुन्न करून टाकणारी आहे.

आम्ही जिंकणारच हा पाकिस्तानी  सैनिकांचा अविर्भाव आणि हरल्यानंतर येणारी शरमेची भावना लपून राहत नाही. घरी जाण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे चक्क पाकिस्तानी तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारे तिघे सहकारी आणि त्यांचा तो प्रवास चित्त थरारून टाकतो.

  युद्धात सहभागी होणारे जफा यांचे सहकारी, त्यांचे रोमहर्षक स्वभाव वाचताना एक निराळीच अनुभूती येते. पहिल्या युद्धात होणाऱ्या सहकाऱ्याला  सांभाळून घेताना करावी लागलेली मानसिक कसरत जफा यांच्या समजूतदार स्वभावाचे दर्शन घडवतात.