Tuesday, July 5, 2016

सखा

          आज कपाट  उघडले आणि सेंट ची बाटली हाती लागली. आणि त्याची प्रकर्षाने आठवण झाली. मी मनात त्याला नेहमी सखा म्हणते. सतत मनात रुंजी घालणारा . तो वयाने मानाने दोन्ही ने माझ्यापेक्षा मोठा. पण आमचे खूप छान जुळायचे. आम्ही खूप वेगवेगळ्या विषयावर गप्पा सुद्धा  मारायचो सिनेमा असो की राजकारण अगदी अध्यात्म सुद्धा आम्हाला वर्ज्य नव्हते. पण आता काही तो माझ्या बरोबर नव्हता. तो कामासाठी दुसऱ्या शहरात जाऊन स्थायिक झाला होता. आता फक्त होत्या त्याच्या आठवणी आणि त्याचे येणारे व्हाट्स अँप वरचे मेसेज.
           आज ही आठवतो आहे मला आमच्या भेटीचा तो पहिला दिवस. लोकांमध्ये नाव कमवून असलेल्या माणसाशी होणारी पहिलीच भेट होती ती . पण तो इतका साधा सुद्धा हसमुख आणि समजूतदार पणे  वागला की हळू हळू आमची मैत्री कधी झाली कळले सुद्धा नाही मला. मीच बऱ्याच वेळा हट्ट करायचे की आता बोलायचे आहे पण कधी तो कामात असेल याची काही काळजीच नाही मला. पण तो फार समजूतदार नंतर बोलीन हा आता कामात आहे असे शांतपणे सांगायचा .
            काही महिन्यापूर्वी असाच रस्त्यात अचानक भेटला आणि म्हणला एक गुड न्यूज आहे सांगू! मी म्हणले सांगा ना किती छान. मला एक नवीन असाइनमेंट मिळाली आहे. मी लगेच विचारले कुठे कसली
? माझे प्रश्न काही थांबेना. तो म्हणाला अग हो सांगतो सांगतो. मग त्याने सांगितले मला एक जे हवे होते ते काम करायला मिळते आहे  पण मला तिथे २ वर्षासाठी शिफ्ट व्हावे लागेल. मग मी परत येईन. ओह हे ऐकल्यावर मला एकदम कळेचना कसे व्यक्त व्हावे. एकाच वेळी मला आनंद ही झाला होता की त्याला हवे ते करायला मिळते  आहे म्हणून आणि दुसरीकडे आता पूर्वीसारख्या गप्पा आणि भेटी होणार नाहीत याची हुरहूर लागली होती. तसे मी कसे आहे सगळे तिकडे काम जमेल का ?हवामान सूट नाही झाले तर ? असे बरेच प्रश्न विचारून पाहिले. असे वाटले एकदा त्याला थांबवावे सांगावे तु तिकडे गेलास की मी काय करायचे एवढा छान मित्र शोधून नाही सापडणार. मनातले हे विचार बाजूला ठेवून मी त्यांचे अभिनंदन केले आणि मग तो निघून गेला. मी घरी आले आणि असे वाटले की एकदम सगळे भकास झालेय. थोडी मनाची समजूत घालायला वेळ लागला पण मग म्हंटले मी त्याची चांगली मैत्रीण आहे म्हणजे त्याला मी मोकळीक द्यायला हवी. त्याने फक्त माझ्याशी बांधून घ्यावे असे तर मैत्रीचे नाते कधीच नसते हा विचार मनात आल्यावर जरा शांत वाटले                
        त्याचा जाण्याचा दिवस ठरला. तो म्हणाला भेटणार आहेस का. आम्ही भेटलो गप्पा झाल्या आणि मग निघताना एक छान सेंट ची बाटली त्याने मला दिली त्याची आठवण म्हणून. मी निघाले आणि म्हणले स्वतःबद्दल कळवत राहा नवीन काय करतो आहेस ते. त्याला एकदम भरून आले मला म्हणला खूप बरे वाटले असे म्हणालीस असे वाटले कुणीतरी आहे इथे अजुनी जे माझ्या गोष्टी ऐकण्यासाठी तेव्हढे च उत्सुक आहे.        

1 comment:

RAJIV TAMBE said...

This article is just like a perfume bottle. When you read n read closely you feel the fragrance of the authors feelings.
And when you read the article and go away you experience the fragrance within