Tuesday, July 12, 2016

प्रवास

          प्रवास नवीन अनुभव देतो,गोष्टी शिकवतो आणि महत्वाचे म्हणजे नवीन माणसे त्यांच्या वृत्ती दाखवतो. अगदी आपला देश फिरताना सुद्धा वेगवेगळ्या भाषा आणि त्यांची मजा अनुभवता येते.
          असाच एक प्रवास मी केला. आजही त्या प्रवासाची आठवण आली की अंगावर काटा येतो. माझी  परीक्षा झाली होती. नेहमीसारखे मी आई आणि बाबा प्रवासाला निघालो. या वेळी मनाली, शिमला असा उत्तरेकडचा प्रवास होता. दिल्लीहून आम्ही कालकास्टेशनला पोचलो. त्यानंतर  ते शिमला प्रवास इतका नयनरम्य होता  की डोळ्याचे पारणे फिटले, अगदी माथेरानला जशी छोटी ट्रेन  असते तशीच ट्रेन तिथे  असते.  तिथे इतके छान सौंदर्य दिसते की असे वाटते की ट्रेन मधून उतरूच नये. त्यानंतरकुलू शिमला आणि मनाली   फिरून झाले.निसर्गाचे  लेणे लाभले आहे या भागाला. बर्फात खेळताना फार मजा आली. त्यानंतर आम्ही धर्मशाळा या ठिकाणी जायला बसमधून निघालो. प्रवास दिवस आणि रात्रीचा होता. दिवसभर माणसे चढत उतरत होती. रात्री मात्र अगदी मोजकी ६ माणसे बस मध्ये होती.  मी, आई, बाबा , बसचा कंडक्टर, ड्राइव्हर आणि अजून एक त्यांचा मित्र एवढेच होते. रात्रीचे जेवण झाले. सगळे अगदी पेंगुळले होते.
                 बसचा कंडक्टर मागच्या सीटवर जाऊन झोपला. मी आणि बाबा सुद्धा झोपलो. बस मध्ये फक्त ३ माणसे जागी होती  माझी आई, बस चा  ड्राइव्हर आणि त्याचा मित्र. ती अमावस्येची रात्र होती आणि त्या दिवशी  ग्रहण सुद्धा होते. सगळे म्हणत होते आज शक्यतो प्रवास करू नका. पण पुढचे रिझर्वेशन झाले असल्यामुळे आम्हाला जाणे भाग होते. रस्ता ही सुनसान होता. रस्त्यावर लाईट सुद्धा नव्हते. फार भयाण वाटत होते. ड्राइव्हरला सुद्धा हळू हळू झोप येऊ लागली होती आणि एक वळण आले.  अचानक ड्राइव्हर च्या मित्राने सिगरेट पेटवण्यासाठी काडी पेटवली आणि ड्राइव्हरला त्या प्रकाशात वळण दिसले. त्याने पटकन बस वळवली. हा सगळं प्रसंग आईने पहिला होता. आम्ही तर सगळे झोपेत होतो. पण आईने तो प्रसंग अनुभवला होता. तिच्या छातीत अगदी धस्स झाले. भल्या पहाटे आम्ही धर्मशाळा येथे उतरलो तेव्हा आईने हा प्रसंग आम्हाला सांगितला तेव्हा आम्ही अगदी भयचकित झालो आणि देवाचे आभार मानले की त्या माणसाने काडी पेटवली नसती तर आज काय झाले असते. पण आता मात्र जेव्हा या प्रसंगाची आठवण येते तेव्हा मी म्हणते की आयुष्याची  दोरी बळकट होती नाहीतर हा प्रसंग सांगायला या क्षणी मी जिवंत नसते हो.... !                           

1 comment:

मोकळे मन said...

हे असेच अनुभव लिहून ठेवा जेणेकरून पुढच्या पिढीला उपयोगी पडेल