Monday, July 4, 2016

उत्तर

आपण शिकली सावरलेली माणसे सहज विचार करतो की आपल्याला सगळे कळते. काही विचारले तर पटकन उत्तर देऊ असा आपला गैरसमज असतो. आणि मग कधीतरी असे काही घडते की कळते आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाही देता येत याची जाणीव आपल्याला होते. 
आज सकाळी बेल वाजली आणि मी दार उघडले आमच्या कडे भांडी घासणाऱ्या बाई त्यांच्या मुलीबरोबर आल्या होत्या. ५ वर्षाची स्मार्ट चुणचुणीत मुलगी होती ती. सारखी आईच्या भोवती भोवती करत होती. एक जागी शांत काही बसत नव्हती. आणि तिची आई काम करता करता तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. आई मुलीचा अगदी सुख संवाद चालू होता. मुलगी प्रश्न विचारून भंडावून सोडत होती. आईने म्हंटले ही की अग जरा शांत बस. पण हिची आपली बडबड सुरू. आई आज शाळेत हे शिकवले मग तू खाऊ कधी आणणार आहेस मग हाच खाऊ हवा. मला तर कळेना कश्या ह्या रोज हिच्या प्रश्नांची उत्तरे देत असतील. आई ने सांगितले म्हणून पाच मिनिटे ती बाहेर येऊन बसली. त्याचे कपडे धुऊन झाले आणि मग ही परत आईजवळ जाऊन म्हणते किती वेळ लागणार आहे ग तुला लवकर चल ना. आणि अचानक तिने आईला एक प्रश्न विचारला आणि मी चकित च झाले. एवढीशी पोर पण तिच्या प्रश्नाचे उत्तर तिच्या आईला देणे अवघड होऊन बसले. ती विचारात होती आई तू दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी का करतेस ग? आणि आमच्या बाई च काय पण माझ्या ही गळ्यांत आवंढा दाटून आला. काय उत्तर द्यावे या मुलीला ?परिस्थिती शिक्षण की जगण्याची धडपड यातले काय कमी पडले असावे. तिच्या आईने तिला मोठा खाऊ घेऊन देईन असे आश्वासन दिले आणि उत्तर देण्याचे टाळले. पण त्यानंतर त्या मुलीशी नजर मिळवण्याचा  मला काही धीर होईना.                        

No comments: